वाटद आरोग्य केंद्रात ५० बेडचे सेवा केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:40+5:302021-05-08T04:33:40+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटात वाढती कोरोना संख्या लक्षात घेऊन रुग्णांसाठी कोरोना विलगीकरण कक्ष प्राथमिक ...
रत्नागिरी : तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटात वाढती कोरोना संख्या लक्षात घेऊन रुग्णांसाठी कोरोना विलगीकरण कक्ष प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदअंतर्गत ५० बेडचे सेवा केंद्र सुरू करण्यात आले.
या सेवा केंद्राचे उद्घाटन जयगड सागरी पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या हस्ते झाले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुकाध्यक्ष प्रदीप साळवी, उद्योजक किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाटद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या व माजी समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, पंचायत समिती सभापती संजना माने, माजी सभापती मेघना पाष्टे, विभागप्रमुख कल्याणकर, विभाग संघटक उदय माने यांच्या प्रयत्नाने खंडाळा-वाटद येथे हे सेवा केंद्र सुरू करण्यात आले.
वाटद जिल्हा परिषद गटातील वाढती रुग्णसंख्या पाहता व रत्नागिरीत बेडसुद्धा मिळणे कठीण झाल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आवाहनास प्रतिसाद देत जिंदाल उद्योग समूहाच्या मदतीने वाटद-खंडाळा येथे अतिशय चांगली सोय परिसरातील सर्व डॉक्टर्स, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, स्टाफ मिळून हे विलगीकरण कक्षातील रुग्णसेवा मोफत करणार आहेत. रुग्णांना जेवण, पौष्टिक नाश्ता व आवश्यक सोयी पुरविण्यात आल्या आहेत. या उद्घाटनप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रकाश साळवी, समाजसेवक सुनील जाधव, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, माजी सरपंच बापू घोसाळे, राजेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती कदम, नेत्रा नागवेकर यांची उपस्थिती होती.