बोरिवली गावातील ५० लोकांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:26 AM2021-05-03T04:26:10+5:302021-05-03T04:26:10+5:30
दापोली : तालुक्यातील दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या बोरिवली गावामध्ये तापाची साथ पसरल्याने आराेग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. आराेग्य ...
दापोली : तालुक्यातील दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या बोरिवली गावामध्ये तापाची साथ पसरल्याने आराेग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. आराेग्य यंत्रणेने ग्रामस्थांची काेराेना चाचणी केली आणि ५० जण पाॅझिटिव्ह आले. मात्र, ग्रामस्थांनी घाबरून न जाता आलेल्या आजारावर मात करीत यश मिळविले. १५ दिवसांत तीन वर्षांच्या मुलापासून ८५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सारेच काेराेनामुक्त झाले.
तसेच बोरिवली गावात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मात्र गावाने पुढाकार घेऊन आणि एकमुखी निर्णय घेऊन ज्या लोकांना ताप येत होता आणि येऊन गेला होता अशा सर्व लोकांची कोरोनाची चाचणी करून घ्यायचे निश्चित केले. त्याप्रमाणे दाभोळ प्राथमिक केंद्राचे डॉ. वैभव दळी, परिचारिका आणि आरोग्य अधिकारी यांना माहिती देऊन दिनांक १५ एप्रिल रोजी सुमारे १०० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५० लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली; परंतु बोरिवली गावाने घाबरून न जाता, धैर्याने आणि हिमतीने लढा देण्याचे ठरविले.
दाभोळ प्राथमिक केंद्राचे डॉक्टर, आरोग्य अधिकारी, परिचारिका आशा सेविका, ग्रामपंचायत, ग्रामकृती दल आणि ग्रामस्थांनी कोरोना रुग्णांची विशेष काळजी घेतली. वेळेवर झालेले निदान आणि वेळेवर झालेल्या औषधोपचाराने बोरिवलीतील ५० कोरोना रुग्ण दिनांक ३० एप्रिल रोजी पूर्णत: बरे झाले. शासनाच्या ‘ब्रेक द चेन’चा आणि नियमांचे पालन करीत बोरिवली गाव कोरोनामुक्त झाले आहे. वेळेवर निदान, वेळेवर उपचार आणि भीती न बाळगता कोरोनावर मात करता येते हे बोरिवली गावाने दाखवून दिले आहे.