पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात

By admin | Published: November 21, 2014 10:00 PM2014-11-21T22:00:40+5:302014-11-22T00:12:16+5:30

रत्नागिरी एमआयडीसी : हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा सुरू, नोव्हेंबर महिन्यातच घशाला कोरड

50 percent reduction in water supply | पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात

पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात

Next

रत्नागिरी : रत्नागिरी शहर, मिरजोळेसह परिसरातील नऊ गावच्या नळयोजनांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात एमआयडीसीने ५० टक्के कपात केली आहे. हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा कामामुळे पंधरा दिवस पाणीकपात लागू राहणार असून, त्यानंतर पूर्ववत पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, या पाणीकपातीमुळे अवलंबून असलेल्या सर्वच गावांत नळयोजनांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, जॅकवेलमधील गाळ उपसा करण्यास एवढे दिवस कशासाठी लागतात? असा सवाल आता जाणकारांमधून केला जात आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून हरचेरी येथील जॅकवेलचा गाळ उपसा करण्यात येतो. मात्र, गाळ उपसा करण्याच्या नावाखाली १५ दिवसांचा घेतला जाणारा अवधी हा अधिक आहे. जे काम आठवडाभराच्या आत होऊ शकते, त्यासाठी पंधरा दिवस कशासाठी, असाही सवाल जलव्यवस्थापनातील जाणकारांकडून केला जात आहे.
धरणात पुरेसा पाणीसाठी असताना तांत्रिक कारणावरून १५ दिवस पाणीकपात करण्याची आवश्यकताच नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जॅकवेलमधील गाळ उपसा काम कशातऱ्हेने चालते, त्यासाठी पंधरा दिवसांचा घेतला जाणारा वेळ हा योग्य आहे की कमी दिवसात हे काम करता येईल, याची पाहणी व तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. याशिवाय ग्रामपंचायतींनीही स्वत:च्या क्षेत्रात पाण्याचे अन्य स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच काही ठिकाणी पर्याय म्हणून बोअरवेल्स काढणेही आवश्यक आहे.


भविष्यकालीन नियोजन हवे
रत्नागिरी शहर व परिसरातील अनेक गावांचे शहरीकरण जोरात सुरू आहे. गावांचा विस्तार वाढत असताना अनेक अपार्टमेंट्स उभ्या राहात आहेत. त्यामुळे लोकसंख्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पालिकेने भविष्यकालीन अधिकच्या पाण्यासाठी बावनदीचे काही टक्के पाणी पालिकेसाठी राखीव करुन मिळावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. परंतु भविष्यात रत्नागिरीसह हातखंब्यापर्यंतची गावे धरून मोठ्या शहराचा विचार होऊ शकतो. त्यामुळे पाण्याचा प्रश्न ही मोठी गंभीर समस्या बनू पाहात आहे. त्यामुळे पालिका व सर्वच गावांनी एकत्र येऊन भविष्यातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आतापासूनच पाण्याच्या उद्भवांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मोठ्या नदीवरून या संपूर्ण परिसरासाठी नळपाणी योजना आराखडा तयार करण्याचीही आवश्यकता आहे.


गाळ उपसा चालणार
३० नोव्हेंबरपर्यंत
एमआयडीसीतर्फे एमआयडीसी मिरजोळे, कुवारबाव, शिरगाव, नाचणे, मिऱ्या, कर्ला, पोमेंडी खुर्द, कारवांचीवाडी, रत्नागिरी नगरपरिषदेचा काही भाग यांना मिळून दररोज ९ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. सध्या गाळ उपसा सुरू असल्याने हा पुरवठा निम्मा म्हणजेच साडेचार एमएलडी एवढा केला जात आहे. १७ पासून सुरू झालेला हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा ३० पर्यंत चालणार आहे.


धरणक्षेत्रात मुबलक पाणी
एमआयडीसीने नळपाणी योजनांना केलेली पाणीकपात ही काही तांत्रिक कारणांमुळे (गाळ उपसा) आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणे यंदाही हरचेरी, निवसर, असोडे, आंजणारी, घाटीवळे या धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा आहे. पूर्ण क्षमतेने पाणी भरलेले आहे. १६.५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे जुलै २०१५ पर्यंत पुरेल इतका हा पाणीसाठा असल्याची माहिती एमआयडीसीचे सहायक अभियंता बी. एन. पाटील यांनी दिली.


अनेक ग्रामपंचायतीना फटका...
एमआयडीसीकडून हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा सुरू.
रत्नागिरी, मिरजोळे, कुवारबाव, शिरगाव, नाचणे, कर्ला गावांचा समावेश.
गाळ उपसा कामाला १५ दिवस अनावश्यक, नागरिकांच्या प्रतिक्रिया.

रत्नागिरी एम्आय्डीसीकडून हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा काम सुरू आहे. या जॅकवेलमध्ये धरणक्षेत्रातील पाच ठिकाणी उभारलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांमध्ये अडविलेले पाणी आणले जाते. त्यातीलच पहिल्या छायाचित्रात अंजणारी येथे व दुसऱ्या छायाचित्रात असोडे येथे अडविण्यात आलेला हा जलसाठा दिसत आहे.

Web Title: 50 percent reduction in water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.