कोकण कृषि विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के आरक्षण : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 04:00 PM2019-02-22T16:00:09+5:302019-02-22T16:02:37+5:30
राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठाच्या धर्तीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश महसूल व कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
रत्नागिरी : राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठाच्या धर्तीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश महसूल व कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासंदर्भात मंत्रालयात बुधवारी बैठक झाली. या बैठकीला राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, उपसचिव गावडे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ४० वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले.
महात्मा फुले विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के नोकऱ्या दिल्या जात आहेत. मात्र, कोकणामधील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न रखडला आहे. राहुरी येथील विद्यापीठाच्या धर्तीवर कोकणातील प्रकल्पग्रस्तांनाही न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार डावखरे यांनी केली. त्यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित निर्णय न्यायालयाच्या आदेशाने घेण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी दोन कृषी विद्यापीठांना वेगवेगळा न्याय होऊ शकत नाही, असे म्हणत कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या.
या निर्देशांमुळे गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न वेगाने मार्गी लागणार आहे. विद्यापीठातील शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येकडेही आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यावेळी कृषिमंत्र्यांनी सचिवांना तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे विद्यापीठात लवकरच जादा शिक्षकांची नियुक्ती होणार आहे.
आंबेनळी अपघातात मृत्युमुखी कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून नोकरी मिळाली नसल्याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यावेळी पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाला तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले.
कुलगुरुपदासाठी शनिवारी मुलाखत
कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर लवकरात लवकर कुलगुरुंची निवड करण्याची मागणी आमदार डावखरे यांनी केली. त्यावेळी या पदांसाठी येत्या शनिवारी (ता. २३) मुलाखती होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यानंतर प्राधान्याने कुलगुरुपदावर नियुक्ती केली जाणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.