काेडजाई नदीच्या पुरामुळे ५० विद्यार्थी अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:22 AM2021-07-20T04:22:31+5:302021-07-20T04:22:31+5:30
दापाेली : तालुक्यात मुसळधार काेसळणाऱ्या पावसामुळे कोडजाई नदीने ओलांडली धोक्याची पातळी आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे ५० विद्यार्थी पलीकडे अडकून ...
दापाेली : तालुक्यात मुसळधार काेसळणाऱ्या पावसामुळे कोडजाई नदीने ओलांडली धोक्याची पातळी आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे ५० विद्यार्थी पलीकडे अडकून पडले आहेत. काही नागरिकांनी जीव धोक्यात घालून नदी पार करण्याचा प्रयत्न केला. पुराच्या पाण्यातून येण्याचा प्रयत्न करताना सुदैवाने दोन दुचाकीस्वार बालंबाल बचावले. नदीवरून पुराचे पाणी ओसरेपर्यंत काेणीही नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन सरपंच प्रभाकर लाले यांनी केले आहे.
जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून, जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील कोडजाई नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे २५ गावाचा संपर्क तुटला आहे. हा पूल चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याने ही समस्या ओढावत असल्याचे सांगण्यात येत आहे.
--------------------------
गेली पाच वर्षे या नदीवरील धोकादायक पुलाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. अतिवृष्टीत या नदीवरून पुराचे पाणी वाहत असते आणि त्यामुळे आम्हाला सुट्टी देण्यात येते. त्यामुळे शैक्षणिक नुकसानही होत आहे. काही तरुण छाती एवढ्या पाण्यातून या पुलावरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात; परंतु हा प्रकार जिवावर बेतू शकतो.
- प्रतीक भांबुरे, विद्यार्थी
------------------------
नदीवरील पुलाचे काम चुकीचे झाल्यामुळे लोकांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच शेतकऱ्यांचीसुद्धा शेतीचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या पुलाचे काम योग्य पद्धतीने करून पंचक्रोशीतील लोकांना दिलासा द्यावा.
- प्रभाकर लाले, सरपंच