पुरामुळे खेर्डीमधील उद्योजकांचे ५०० कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:32 AM2021-08-15T04:32:42+5:302021-08-15T04:32:42+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : चिपळूण शहर, खेर्डी व परिसराला पूरपरिस्थितीचा फटका बसला. खेर्डी येथील औद्योगिक वसाहतीतील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : चिपळूण शहर, खेर्डी व परिसराला पूरपरिस्थितीचा फटका बसला. खेर्डी येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या मालमत्तेचे साधारणपणे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर उद्योग पुन्हा उभे करण्यासाठी उद्योजकांना अधिकचा खर्च करायला लागणार आहे. हे सर्व नुकसान २५०० कोटींपर्यंत होण्याची शक्यता आहे. अशा वेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सहानुभूती व मदत खेर्डी औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना मिळावी, अशी मागणी खेर्डीतील उद्योजकांनी केली.
महापुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर यांनी खेर्डी, खडपोली व लोटे औद्योगिक वसाहतीस भेट दिली. येथील उद्योजकांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी खेर्डी येथील उद्योजकांनी सहायक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानुसार, खेर्डी व खडपोली औद्योगिक क्षेत्राचे उद्योजक वेळोवेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व कर व शुल्क भरत आहेत. या बदल्यात औद्योगिक क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा, रस्ते, गटार, स्ट्रीट लाइट्स आदी सुविधा उत्तम स्वरूपाच्या मिळाव्यात. औद्योगिक विकासासाठी या सुविधांमध्ये सुधारणा करण्याची अत्यंत गरज आहे. या सुविधा सुधारण्याकरिता आपण ठोस पावले उचलावीत. तूर्तास औद्योगिक क्षेत्रामध्ये बाहेरून आणून टाकलेला चिखल व कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. पुरामुळे खचलेल्या व इतर ठिकाणी दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांचे त्वरित दुरुस्तीकरण व्हायला हवे. संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात गटाराची नवीन यंत्रणा बांधण्यात यावी, जेणेकरून पावसाचे पाणी रस्त्यावर साचणार नाही. पूरपरिस्थितीत वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक भिंत अथवा त्याच प्रकारच्या उपाययोजना पुढील पावसाळ्याच्या आधी कराव्यात. खेर्डी येथील पाण्याची पाइपलाइन ही जुनी झाल्यामुळे वारंवार त्याची दुरुस्ती करायला लागते.
खेर्डी क्षेत्रातील पाइपलाइन ही पूर्णतः नवीन बांधण्यात यावी. पुरामुळे अनेक उद्योजकांकडे हवी ती कागदपत्रे गहाळ झाली आहेत व आर्थिक नुकसानसुद्धा झालेले आहे. अशा परिस्थितीत, सगळ्या तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रियांमध्ये या गोष्टीचा विचार व्हावा व उद्योजकांना याबाबतची सवलत देण्यात यावी. निवेदन देताना मार्च रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल त्यागी, सहकार्यवाह अविनाश शिंदे, उद्योजक गजानन कदम, बळवंत पाटील, शशी देसाई, दशरथ दाभोळकर, लोटे औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन उपस्थित होते.