चिपळुणातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या खात्यात ५० हजार जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:52+5:302021-09-27T04:34:52+5:30
चिपळूण : महापुरात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांच्या खात्यात तातडीची ५० हजारांची रक्कम जमा होऊ लागली आहे. याशिवाय पूरग्रस्त नागरिकांच्या खात्यातही ...
चिपळूण : महापुरात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांच्या खात्यात तातडीची ५० हजारांची रक्कम जमा होऊ लागली आहे. याशिवाय पूरग्रस्त नागरिकांच्या खात्यातही रक्कम जमा होत असल्याने त्यांनाही दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत १०,१७० लाभार्थ्यांना १२ कोटी ५३ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील व्यापाऱ्यांना २ कोटी २९ लाख रुपयांचे वाटप पूर्ण झाले असून, अजूनही वाटपाचे काम सुरूच आहे.
चिपळूण शहरासह परिसरात २२ व २३ जुलै रोजी महापूर आला होता. यावेळी व्यापाऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पूरग्रस्तांना शासनाने जाहीर केलेली मदत थेट नागरिकांच्या खात्यात जमा होत असताना व्यापारी मात्र मदतीपासून वंचित होते. याची दखल घेऊन आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांना तातडीने मदत निधा देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत व्यापाऱ्यांना तातडीची मदत देण्यास सुरूवात झाली आहेण
व्यापाऱ्यांच्या खात्यात ५० हजारांची रक्कम जमा होत असल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत व्यापाऱ्यांच्या काही तक्रारी असल्यास संघटनेकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेवटच्या व्यापाऱ्याला मदत मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.