जिल्ह्यात ५०७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:35+5:302021-06-26T04:22:35+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाबाधित ५०७ रुग्ण सापडले असून, एकूण ५९,५६३ रुग्ण झाले आहेत. १३ रुग्णांचा कोरोनाने ...
रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाबाधित ५०७ रुग्ण सापडले असून, एकूण ५९,५६३ रुग्ण झाले आहेत. १३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृत्यूची संख्या १,७०४ झाली आहे. तर १४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने एकूण ५१,१६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी दर ७.३५ इतका खाली आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या असून, दिवसभरात ५,३४४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये आरटीपीसीआर २,४८२ चाचण्यांमध्ये २२७ रुग्ण तर अँटिजन २,८६२ चाचण्यांमध्ये १६६ रुग्ण सापडले, तर मागील ११४ कोरोना रुग्ण आहेत. संगमेश्वर तालुक्यात सर्वात जास्त १,६११ कोरोना चाचण्या तर, मंडणगड तालुक्यात सर्वात कमी ७२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बाधित रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यात ५ रुग्ण, दापोलीत १५ रुग्ण, खेडमध्ये १८ रुग्ण, चिपळूणात १०० रुग्ण, गुहागरात ११ रुग्ण, संगमेश्वरात ७१, रत्नागिरीत १४४, लांजात १९ आणि राजापुरातील १० रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित १२ रुग्णांचा शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यू तर एका रुग्णाचा मृत्यू प्रवासादरम्यान झाला आहे. मृतांमध्ये चिपळूण तालुक्यातील ६ रुग्ण, रत्नागिरीतील २ आणि दापोली, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामध्ये ५ महिला आणि ८ पुरुष रुग्ण आहेत. कोरोनाबाधित मृत्यूदर २.८६ टक्के आहे.