श्रमदानातून ५११ बंधारे पूर्ण
By admin | Published: November 18, 2016 11:14 PM2016-11-18T23:14:36+5:302016-11-18T23:14:36+5:30
पाणीटंचाईवर मात करणार : ग्रामस्थांच्या सहकार्याने शेकडो बंधाऱ्यांची कामे सुरु
रत्नागिरी : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या धर्तीवर मिशन बंधारे २०१६ अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गावोगावी लोकसहभागातून बंधाऱ्यांची शेकडो कामे सुरु असून, सुमारे ५११ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये विद्यार्थी, स्थानिक रहिवासी श्रमदानासाठी पुढे सरसावल्याने जिल्हा परिषद कृषी विभाग अधिक जोमाने उतरला आहे.
जिल्ह्यात चालू वर्षात जूनच्या पंधरवड्यामध्ये ११२ गावांतील २०५ वाड्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असले तरी जांभ्या दगडाच्या जमिनीमुळे पाणी वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्यात विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. त्याचा चांगला परिणाम उन्हाळ्यात दिसून येतो. बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाई लांबणीवर पडली होती.
यंदाचे पावसाचे प्रमाण आणि दरवर्षी जिल्ह्यात उद्भवणारी पाणीटंचाई याचा विचार करता येत्या उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार, हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यात सुमारे ७ हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यामध्ये वनराई, विजय आणि कच्चे या बंधाऱ्यांचा समावेश आहे.
यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त कोसळल्याने बंधारे बांधण्याचे काम उशिरा सुरु करण्यात आले. ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे आदींमध्ये वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, दगड, माती आदिंचा वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या १० दिवसांमध्ये अनेक ठिकाणच्या गावांमध्ये सुमारे ५११ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
जिल्ह्यात गावोगावी बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सुमारे शेकडो बंधाऱ्यांची कामे सुरु असून, हजारो लोक विनामोबदला सक्रियपणे या कामात घाम गाळत आहेत. जिल्ह्यात ७ हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बंधारे उभारण्याची कामे सुरू आहेत. (शहर वार्ताहर)
जिल्ह्यात ७ हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे ७ हजार बंधारे उभारण्याचे जाहीर केले. त्याच वेळी त्यांनी स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, जनता आणि खासगी कंपन्यांना सहकार्याचे आवाहनही केले आहे. जास्तीत जास्त बंधारे उभारण्यासाठी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद आणि कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख हे तालुक्यांमध्ये ग्रामसेवक व अन्य अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जास्तीत जास्त बंधारे उभारण्याबाबत प्रोत्साहन देत आहेत. तसेच बंधारे बांधकामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटीही देत आहेत.