जिल्ह्यात सात वर्षांत लेप्टोचे ५१४ रुग्ण
By admin | Published: August 21, 2016 10:24 PM2016-08-21T22:24:04+5:302016-08-21T22:24:04+5:30
१४ जणांचा मृत्यू
रहिम दलाल ल्ल रत्नागिरी
सात वर्षांमध्ये लेप्टोस्पायरोसीस या जीवघेण्या रोगाचे ५१४ रुग्ण आढळून आले असून, त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या आर्थिक वर्षातील चालू पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत लेप्टाचे २८ रुग्ण सापडले.
लेप्टोस्पायरोसीस हा रोग बाधित प्राणी उंदीर, डुक्कर, गायी, म्हशी व कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. हे जंतू एक वर्षापर्यंत लघवीतून बाहेर पडतात. काही प्राण्यांत आयुष्यभर हे जंतू शरीरात राहतात. या प्राण्यांच्या लघवीचे दूषित पाणी, माती भाज्या यांच्या व माणसांच्या त्वचेशी संपर्क आल्यास हा रोग होतो.
मागील सात वर्षांच्या पावसाळ्यामध्ये लेप्टोने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सन २०१०-११ मध्ये २५ जणांना या रोगाची लागण होेऊन २ लोक दगावले होते. तसेच २०११-१२ या दुसऱ्याच वर्षीच्या पावसाळ्यामध्ये लेप्टोची भयंकरपणे १३८ जणांना लागण झाली होती. त्यामध्ये ९ रुग्णांचा मृत्यु झाला होता. सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात ८२ जणांना लेप्टो झाला असला तरी एकही रुग्ण मृत्यू पावलेला नाही. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात लेप्टोचे १०१ रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये उपचार सुरु असताना लेप्टोच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता.
आतापर्यंत लेप्टो झालेले १४ रुग्ण जिल्ह्यात दगावले आहेत. सन १०१४-१५मध्ये ८४ रुग्ण, तर सन २०१५-१६ मध्ये ५६ रुग्ण सापडले असून, या दोन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात लेप्टोच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
मागील सात वर्षांपासून जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लेप्टोबाबत घ्यावयाची काळजी यावर जोरदार प्रचार, प्रसार मोहीम राबविली. त्याचा परिणाम म्हणून आज शेतीची कामे सुरु असताना जिल्ह्यात मागील पाच वर्षांपेक्षा लेप्टोच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे.
चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत जिल्ह्यात लेप्टोचे केवळ २८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यामध्ये सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालये या ठिकाणी या आजारावरील पुरेसा औषधसाठाही ठेवण्यात आलेला आहे. (शहर वार्ताहर)
लेप्टोची लक्षणे :
तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाजणे, कावीळ, रक्तस्त्राव, डोळे सुजणे, मुत्रपिंडाचे, यकृताचे काम बंद पडून मृत्युही ओढवू शकतो.
जिल्ह्यात सात वर्षातील लेप्टोस्पायरोसीसची स्थिती
सन सापडलेले रुग्ण
२०१०-११ २५
२०११-१२ १३८
२०१२-१३ ८२
२०१३-१४ १०१
२०१४-१५ ८४
२०१५-१६ ५६
२०१६-१७ २८
प्रतिबंधात्मक उपाययोजना :
४दूषित पाणी, माती किंवा भाज्या यांचा मानवी संपर्क टाळणे हा उपाय आहे.
४दूषित पाण्याशी संपर्क ठेवणे अपरिहार्य असल्यास रबरबूट, हातमोजे वापरावेत.
४या आजाराचा रूग्ण आढळल्यास त्याची माहिती तत्काळ आरोग्य विभागाला कळवावी.
४शेतामध्ये काम करणारे शेतकरी तसेच प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती यांनी त्यांना जखम झालेली असल्यास त्वरित ड्रेसिंग करुन घ्यावे.