बोरिवली येथील ५४ लोकांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:13 AM2021-05-04T04:13:41+5:302021-05-04T04:13:41+5:30
दाभोळ : दापाेली तालुक्यातील दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्याअंतर्गत येणार्या बोरिवली गावातील तब्बल ५४ पॉझिटिव्ह रुग्णांनी एकाचवेळी कोरोनावर यशस्वी ...
दाभोळ : दापाेली तालुक्यातील दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्याअंतर्गत येणार्या बोरिवली गावातील तब्बल ५४ पॉझिटिव्ह रुग्णांनी एकाचवेळी कोरोनावर यशस्वी मात केली. यामध्ये लहान मुलांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गावात तापाची साथ पसरली होती. दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात या गावातील रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तालुक्यातील जवळपास सर्वच गावात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. आघारी - पंचनदी - बोरीवली ग्रुप ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन आणि बोरिवली गावातील ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेऊन ज्या लोकांना ताप येत होता आणि येऊन गेला होता, अशा सर्व लोकांची कोरोनाची चाचणी करून घ्यायची निश्चित केले. त्याप्रमाणे दाभोळ प्राथमिक केंद्राचे डॉ. वैभव दळी, परिचारिका प्रिया बोरकर, विद्या वराडकर व आशासेविका उल्का तोडणकर यांना माहिती देऊन १५ एप्रिल रोजी सुमारे १०० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५४ लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
दापोली शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे पॉझिटिव्ह रुग्णांना बेड मिळत नसल्याने इतरत्र व्यवस्था करावी लागत होती. परंतु, बोरिवली गावातील ग्रामस्थांनी घाबरुन न जाता धैर्याने आणि हिमतीने लढा देण्याचे ठरवले.
गावात आढळलेल्या तब्बल ५४ पॉझिटिव्ह रुग्णांचे घरातच स्वतंत्र अलगीकरण करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला. संपूर्ण गावच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने जीवनावश्यक व अत्यावश्यक सुविधा ग्रामस्थांना घरपोच देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. चौदा दिवसांच्या गृह अलगीकरणाच्या कालावधीत दाभोळ प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, आशा सेविका व अंगणवाडी सेविकांनी कोरोना रुग्णांची विशेष काळजी घेतली. वेळेवर झालेले निदान आणि वेळेवर झालेल्या औषधोपचाराने बोरिवलीतील त्या ५४ कोरोना रुग्णांनी ३० एप्रिल रोजी कोरोनावर मात केली आहे.
यामध्ये ८४ वर्षांचे पुरूष वृद्ध, ८० वर्षांची वृद्धा, ७५ वर्षांचे पुरूष वृद्ध, ६८ वर्षांचे पुरूष वृद्ध, ७० वर्षांचे तीन पुरूष यांचा समावेश आहे.
शासनाच्या नियमांचे पालन करत व ग्रामपंचायत, ग्राम कृती दल यांच्या सहकार्याने बोरिवली गाव कोरोनामुक्त झाला आहे. वेळेवर निदान, वेळेवर उपचार आणि भीती न बाळगता कोरोनावर मात करता येते हे बोरिवली गावाने दाखवून दिले आहे. या कोरोनामुक्तीमध्ये सरपंच अमिषा तांबट, उपसरपंच अमित नाचरे, ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. गौरत, दाभोळ सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरू जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश सावर्डेकर, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, तलाठी, प्राथमिक शिक्षक, पोलीसपाटील व गावातील ग्रामस्थ यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
............................
एकमेकांची साथ
पाणी, सॅनिटायझर, जंतूनाशक फवारणी, प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या या सर्व ग्रामस्थांना पुरविण्यात आल्या. अलगीकरणात राहणाऱ्या संपूर्ण गावाला दररोज लागणारा किराणा माल व भाजीपाला एका खासगी किराणा दुकानातून घरपोच देण्याची व्यवस्थाही ग्रामपंचायतीने ग्राम कृती दलाच्या सहकार्याने केली. ग्रामस्थांनीही त्यांना चांगली साथ दिली.