दिल्लीला ५,४०० डझन आंबा रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:31 AM2021-04-17T04:31:09+5:302021-04-17T04:31:09+5:30
रत्नागिरी : या वर्षी आंबा उत्पादन कमी असले तरी अन्य राज्यांसह परदेशातून आंब्याला विशेष मागणी होत ...
रत्नागिरी : या वर्षी आंबा उत्पादन कमी असले तरी अन्य राज्यांसह परदेशातून आंब्याला विशेष मागणी होत आहे. आतापर्यंत रत्नागिरीतून दिल्लीमध्ये पाच हजार चारशे डझन आंबा पाठविण्यात आला असून, एक हजार ६६४ डझन आंबा लंडन, कतार, कॅनडासाठी थेट रत्नागिरीतून निर्यात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांकडील पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला आहे. गुढीपाडव्याला स्थानिक तसेच मुंबई मार्केटमध्ये बागायतदारांनी आंबा विक्रीसाठी पाठविला. परदेशातून मागणी होत असतानाही अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत कॅनडासाठी ४५० डझन, लंडनसाठी ७८८ डझन तर कतारसाठी ४२६ डझन आंबा निर्यात झाला आहे. दिल्लीसाठी एकूण १८०० डझन आंबा पाठविण्यात आला आहे. दिल्लीतून पुन्हा आंब्यासाठी मागणी नोंदविण्यात आली आहे. कॅनडासाठी ४०८ व लंडनसाठी ४२० डझन आंब्याची नव्याने मागणी नोंदविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना जागेवरच आंब्याला ८५० रुपये डझन दर लाभत आहे. वाशी मार्केटमधून आखाती व युरोपीय देशांत निर्यात सुरू असली तरी रत्नागिरीतून थेट निर्यात सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. निर्यातीपूर्वी आंब्याचे ग्रेडिंग, वॉशिंग, ब्रशिंग, ड्राइंग करून तो योग्य पद्धतीने पॅकिंग केला जातो. त्यानंतर वातानुकूलित व्हॅनने मुंबईतील विमानतळावर पाठविण्यात येत आहे.
...................................
अपेडाच्या मान्यतेने सदगुरू एंटरप्रायझेसतर्फे शेतकऱ्यांना जागेवरच चांगला दर प्राप्त व्हावा, तसेच कोकणचा हापूस जगातील विविध देशांपर्यंत पोहोचून बाजारपेठ खुली व्हावी, यासाठी थेट निर्यातीवर भर देण्यात आला आहे. केवळ परदेशातच नाही तर देशातील विविध राज्यांतील बाजारपेठेत आंबा पोहोचावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सदगुरू एंटरप्रायझेस