तब्बल ५४ हजार मोफत पाठ्यपुस्तके पाण्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:33 AM2021-07-30T04:33:28+5:302021-07-30T04:33:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क टेंभ्ये : शाळेत पोहोचण्याअगोदरच चिपळूण तालुक्यातील जवळपास ५४ हजाराहून अधिक मोफत पाठ्यपुस्तके महापुरात बुडाली आहेत. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभ्ये : शाळेत पोहोचण्याअगोदरच चिपळूण तालुक्यातील जवळपास ५४ हजाराहून अधिक मोफत पाठ्यपुस्तके महापुरात बुडाली आहेत. त्यामुळे यावर्षी इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या हातात पोहोचण्याअगोदरच ही पुस्तके टाकून देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. चिपळूण येथील महापुराने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. त्याने कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. या महापुराचा शिक्षण विभागालाही मोठा फटका बसला आहे. चिपळूण शहर व परिसरातील शाळा पाण्यात गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी तब्बल ५३ हजार ४६६ पाठ्यपुस्तके चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला मिळाली होती. ती सर्वच्या सर्व या महापुरात भिजली आहेत. शहरातील बांदल हायस्कूलच्या सभागृहात ठेवण्यात आलेली ही पाठ्यपुस्तके पूर्णपणे भिजल्याने टाकून देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. यामध्ये मराठी माध्यमाची ५० हजार ४९४, तर उर्दू माध्यमाची २ हजार ९७२ पुस्तके होती. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी ही पाठ्यपुस्तके केंद्रानुसार वितरित करण्यासाठी व्यवस्थित लावून ठेवली होती. मात्र वाटपाअगोदरच ही पुस्तके महापुरात भिजली आहेत.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून ही पाठ्यपुस्तके जून महिन्यात शाळा सुरू होताना मिळाली नव्हती. त्यामुळे जुनी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करण्याच्या सूचना शाळांना करण्यात आल्या होत्या. परंतु अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नव्हती. त्यामुळे नवीन पाठ्यपुस्तकांची मागणी केली होती. त्यानुसार मिळालेली ही पुस्तके वितरित करण्यात येणार होती. मंगळवारी शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे - बंडगर यांनी महापुराने चिपळूण येथील शाळांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी दौरा केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथून आलेल्या तरुणांच्या व अन्य स्वयंसेवकांच्या मदतीने ही पुस्तके बाहेर काढण्यात आली व त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक, माध्यमिकचे विस्तार अधिकारी गोपाल चौधरी, केंद्रप्रमुख दीपक खेतले आदी उपस्थित होते.