जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ५५ शाळांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:29 AM2021-08-01T04:29:30+5:302021-08-01T04:29:30+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या ५५ प्राथमिक शाळांची पडझड झाली आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांचे २ कोटी ...
रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या ५५ प्राथमिक शाळांची पडझड झाली आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांचे २ कोटी २० लाख ९१ हजारांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात २२ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने चिपळूण, खेड तालुक्यांमध्ये हाहाकार उडाला होता. त्याचबरोबर संगमेश्वर, लांजा राजापूर आणि दापोली येथील नद्यांनाही छोटे-मोठे पूर आल्याने नुकसान झाले. चिपळूण, खेडमध्ये आजही नुकसानग्रस्तांना मदतीचा ओघ सुरुच आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी अनेक इमारतींची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
जिल्ह्यातील राजापूर, संगमेश्वर, खेड, चिपळूण आणि दापोली या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली. अतिवृष्टीमुळे ५५ प्राथमिक शाळांच्या ८८ वर्गखोल्यांची पडझड झाली आहे. त्यामध्ये चिपळूण तालुक्यात नुकसानीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या तालुक्यात सुमारे १ कोटी ८१ लाख रुपये नुकसान आहे. नुकसानग्रस्त शाळांमध्ये काही शाळांची पूर्णत: पडझड झालेली असून, काहींच्या वर्गखोल्यांचे नुकसान झाले आहे.
---------------------------
गेल्यावर्षी निसर्ग वादळाने अनेक ठिकाणी पडझड झाली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांचे सुमारे ८ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, या नुकसानग्रस्त शाळांच्या दुरुस्तीसाठी केवळ सव्वा कोटी रुपये निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. त्यामुळे पुरेसा निधी न मिळाल्याने अजूनही अनेक नादुरुस्त शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
---------------------------------
तालुका नुकसानग्रस्त शाळा अंदाजे नुकसान लाखात
राजापूर ८ १४.००
संगमेश्वर १७ ११.३२
खेड ४ ३.१७
लांजा ४ २.७५
दापोली २ ८.४७
चिपळूण २० १८१.२०
एकूण ५५ २२०.९१