साकवांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला हवेत तब्बल ५६ कोटी, पावसाळ्यात येते महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 04:34 PM2022-11-04T16:34:54+5:302022-11-04T16:46:56+5:30

साकवांची दुरुस्ती होणे तसेच काही वाड्या-वस्त्यांवरील साकवांची पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचे

56 crores to Ratnagiri district for Sakaw, importance of sakavas comes during monsoon | साकवांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला हवेत तब्बल ५६ कोटी, पावसाळ्यात येते महत्त्व

साकवांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला हवेत तब्बल ५६ कोटी, पावसाळ्यात येते महत्त्व

Next

रहिम दलाल

रत्नागिरी : ग्रामीण भागातील दळणवळणात महत्त्वाची भूमिका असलेल्या साकवांची स्थिती दयनीय झाली आहे. जिल्ह्यात १९१ साकव मोडकळीस आले असून, ते धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे डोंगराळ भागातील ग्रामस्थांना जीव मुठीत धरून त्या साकवांवरून प्रवास करावा लागत आहे. या साकवांची दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि नवीन साकवांसाठी ५६ कोटी २९ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ता नसलेल्या अडचणीच्या ठिकाणी डोंगरदऱ्या, नदीनाले यावर ग्रामस्थांच्या सोयीसाठी साकव बांधण्यात आले आहेत. जिल्ह्यात हजारो साकव आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या साकवांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हे साकव मोडकळीस आल्याने जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ त्यावरून ये-जा करतात. या साकवांची दुरुस्ती होणे तसेच काही वाड्या-वस्त्यांवरील साकवांची पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच काही गावांमध्ये नवीन साकवांची आवश्यकता आहे.  

जिल्हा परिषद रत्नागिरी बांधकाम विभागाने ८७ साकवांसाठी २४ कोटी रुपये तर चिपळूण बांधकाम विभागाने १०४ साकवांसाठी ३२ कोटी २९ लाख रुपये अशा एकूण ५६ कोटी २९ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे. यंदाचा पावसाळा भीतीच्या छायेत गेला. किमान पुढच्या पावसाळ्यासाठी तरी आतापासूनच त्याची तरतूद करण्याची अपेक्षा केली जात आहे.

संपर्काचे एकमेव माध्यम

जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावे, वाड्या, वस्त्यांमधील नदी, नाले, ओढ्यांवर बांधलेले साकव हाच एकमेव संपर्काचे माध्यम आहे. त्यामुळे पावसाळ्यात या साकवांना खूपच महत्त्व येते. नादुरुस्त झालेल्या धोकादायक असलेल्या साकवांमुळे अनेक वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांचे ये-जा करताना हाल होतात. जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या साकवांसाठी जिल्हा नियोजन समितीने जास्तीत जास्त निधी मंजूर करून तो वेळीच देणे आवश्यक आहे.

अशी आहे निधीची गरज
रत्नागिरी विभाग - ८७ साकव,
आवश्यक निधी- २४ कोटी,
चिपळूण विभाग - १०४ साकव,
आवश्यक निधी - ३२ कोटी २९ लाख

Web Title: 56 crores to Ratnagiri district for Sakaw, importance of sakavas comes during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.