अंध, अपंग प्रवाशांसाठी ५७६ काडसचे वाटप
By admin | Published: December 18, 2014 09:10 PM2014-12-18T21:10:46+5:302014-12-19T00:28:40+5:30
योजनेमध्ये प्रवाशांना ७५ टक्के सवलत दिली जाते. विद्यार्थी सवलत पास योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अडरे : प्रवाशांसाठी विविध योजना राबवून तोट्यात चाललेल्या एस. टी.चे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने एस. टी. महामंडळाने प्रयत्न चालविले आहेत. त्यानुषंगाने चिपळूण आगाराच्या वतीने अपंग व अंध प्रवाशांसाठी ५७६ काडर््सचे वाटप करण्यात आले आहे. योजनेमध्ये प्रवाशांना ७५ टक्के सवलत दिली जाते. विद्यार्थी सवलत पास योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांसाठी यात्रा, सण, उत्सव, लग्न समारंभ अशा विविध प्रसंगी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी सवलतीच्या दरात नैमित्तिक कराराने एस. टी.च्या बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
राज्यात चार व सहा दिवसांसाठी हंगामानुसार विहीत केलेल्या दराप्रमाणे गाड्या नैमित्तिक कराराने एस. टी.च्या गाड्या पुरवण्यात येतात. याशिवाय आवडेल तेथे प्रवास पास योजना सुरु करण्यात आली आहे. वार्षिक कार्ड योजनाही १८ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या कार्डधारकांना लागू करण्यात आली आहे. पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर पास योजनाही सुरु करण्यात आली आहे. एस. टी.च्या उत्पन्नात अधिकाधिक भर पडण्याच्या दृष्टीने एस. टी. महामंडळाच्या सर्वच आगारांतून विविध योजना राबवून त्याची अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे. (वार्ताहर)