कोरोना काळात ५९ गुन्हेगार पॅरोल रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:16 PM2020-10-31T12:16:36+5:302020-10-31T12:16:53+5:30
coronavirus, jail, ratnagirinews, police रत्नागिरी येथील विशेष कारागृहात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना ठेवण्यात येते. सध्या या कारागृहात १२६ गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत. कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी त्यातील ५९ कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे.
शोभना कांबळे
रत्नागिरी : येथील विशेष कारागृहात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना ठेवण्यात येते. सध्या या कारागृहात १२६ गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत. कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी त्यातील ५९ कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे.
या कारागृहातील काही कैदी तसेच पोलीस कोरोनाबाधित झाले होते. महाराष्ट्रातील ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार या कारागृहातील तात्पुरत्या जामीनावर ५२ आणि पॅरोलच्या रजेवर ७ अशा एकूण ५९ कैद्यांना सोडण्यात आले आहे. त्यासाठी काही अटी तसेच शर्ती त्यांना पाळाव्या लागत आहेत.
कुठल्या गुन्ह्यामध्ये हे जेलमध्ये होते
पॅरोलवर सोडलेल्या गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. त्यांच्याकडून आर्थिक व महिलांविषयक गुन्ह्यांव्यतिरिक्त खून, मारामारी, खुनाचा प्रयत्न आदी गुन्हे घडलेले आहेत. अशांना सध्या कोरोनाच्या अनुंषंगाने पॅरोलवर सोडण्यात आले आहे.
- कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच अनेक कारागृहातील कैदी तसेच पोलीस बाधित झाल्याने संसर्ग टाळण्यासाठी कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
- दोन प्रकारच्या पॅरोल रजा आहेत. काही कैद्यांना तात्पुरत्या पॅरोल रजेवर म्हणजेच ४५ दिवसांसाठी तर काहींना न्यायालयाच्या आदेशाने मे महिन्यापासून रजेवर पाठविण्यात आले आहे.
- मात्र, या कैद्यांवर पूर्णपणे पाळत ठेवली जाते.
पॅरोलवर सोडलेल्या गुन्हेगारांवर तेथील पोलीस स्थानकाचे लक्ष असते. त्यांची नियमित हजेरी त्या-त्या ठाण्यांवर घेतली जाते. या कैद्यांना दररोज हजेरी लावावी लागत असल्याने त्यांच्याकडून गुन्हे घडत नाहीत.
- हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक,
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, रत्नागिरी.