प्रशासकीय राजवटीमुळे रत्नागिरी जिल्ह्याला ६० कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 06:09 PM2024-08-19T18:09:34+5:302024-08-19T18:10:01+5:30

रत्नागिरी : मुदत संपलेल्या जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांवर गेली दोन वर्षे प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे या संस्थांना ...

60 crores hit to Ratnagiri district due to administrative rule | प्रशासकीय राजवटीमुळे रत्नागिरी जिल्ह्याला ६० कोटींचा फटका

प्रशासकीय राजवटीमुळे रत्नागिरी जिल्ह्याला ६० कोटींचा फटका

रत्नागिरी : मुदत संपलेल्या जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांवर गेली दोन वर्षे प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे या संस्थांना दरवर्षी मिळणारा १५ व्या वित्त आयोगाचा निधी रोखण्यात आला आहे. रत्नागिरीजिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये प्रशासक असल्याने गेल्या तीन वर्षांतील बंधित  आणि अबंधित निधी न मिळाल्याने जिल्ह्याला ६० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या  मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा आधार घेऊन बंधित आणि अबंधित या दोन प्रकारांत निधी दिला जातो. त्यात मूलभूत सुविधांची कामे अबंधित  निधीतून व पाणी पुरवठा, तसेच स्वच्छतेसंबंधीची कामे बंधित निधीतून केली जातात.  जिल्ह्यासाठी वितरित करण्यात येणाऱ्या निधीतून ८० टक्के रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यात थेट वर्ग केली जाते.

उर्वरित प्रत्येकी १० टक्के रक्कम जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. मात्र, प्रशासकीय राजवट असलेल्या पंचायतराज संस्थांना हा निधी न देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रशासकराज असलेली रत्नागिरी जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांना गेल्या तीन वर्षांपासून दमडीही मिळालेली नाही. केंद्र शासनाच्या या भूमिकेमुळे  जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमार्फत ग्रामपातळीवर केल्या जाणाऱ्या विकासकामांना मोठी खीळ बसली आहे.

पंधराव्या वित्त आयोगातून रत्नागिरी जिल्हा परिषदेला दरवर्षी १० कोटी रुपये आणि नऊ पंचायत समित्यांसाठी मिळून १० कोटी असा दरवर्षी निधी येतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर सन २०२२ पासून प्रशासकीय राजवट आहे.  त्यामुळे सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षांमध्ये  जिल्हा परिषदेचा ३० कोटी आणि पंचायत समित्यांचा ३० कोटी असा एकूण ६० कोटी निधी अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे सन २०२२-१३ पासूनचे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे विकास आराखडे रखडले आहेत.

ग्रामपंचायती सक्षम करणे

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासकामे करण्यासाठी केंद्र शासनाकडून  निधी देण्यात येतो. पूर्वी शासनाकडून मिळणारा हा निधी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत आणि पंचायत समितीला वर्ग करण्यात येत होता. त्याचबराेबर जिल्हा परिषदेलाही निधी मिळत होता. केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायत आणि पंचायत समित्यांच्या खात्यात जमा करण्यात येऊ लागला. थेट  निधी मिळाल्याने ग्रामपंचायती सक्षम व्हाव्यात, असा उद्देश आहे.

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून होणारी कामे

  • गावांमध्ये पाणीपुरवठा
  • विद्युत पंप बसविणे
  • पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती
  • गावात सिमेंट काँक्रीटचे रस्ते
  • बंदिस्त गटार
  • आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना साहित्य पुरविणे
  • आरोग्य शिबिर घेणे
  • जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडीला शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करणे

Web Title: 60 crores hit to Ratnagiri district due to administrative rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.