‘शिक्षण’कडे ६० लाख रुपये पडून
By Admin | Published: December 14, 2014 12:04 AM2014-12-14T00:04:43+5:302014-12-14T00:04:43+5:30
सदस्य संतप्त : शाळा दुरूस्ती व कंपाऊंड वॉलची कामे रखडली
रत्नागिरी : जिल्हा नियोजन योजनेंर्गत आलेले ६० लाख रुपये धोरणात्मक शासन निर्णय उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉलची शेकडो कामे रखडली आहेत़ निधी आलेला असतानाही शिक्षण विभागाकडून शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉल बांधकामाच्या याद्या तयार करण्यास उशिर झाल्याने सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा मोडकळीस आल्याने त्या धोकादायक स्थितीत आहेत़ मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोकादायक ठरु शकतात़ त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शाळा दुरुस्तीच्या मागणीला जोर धरला आहे़ त्यातच जिल्हा परिषदेच्या सुमारे एक हजार प्राथमिक शाळांना कंपाऊंड वॉल नाही़ शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉल बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला ६० लाख रुपयांचा निधी आलेला आहे़
शिक्षण समितीच्या मागील सभांमध्ये शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉल बांधकामासाठी निधी आलेला असताना त्यांच्या परिपूर्ण प्रस्तावांची यादी का तयार करण्यात आलेली नाही, असा प्रश्न सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला होता़ त्याबाबत सदस्यांकडून प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात येत होते़ जिल्हा नियोजनकडून आलेला ६० लाख रुपयांचा निधी पडून राहण्यास अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात येत होता़
शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉलची कामांच्या प्रस्तावांच्या अंतिम याद्या उशिरा का होईना त्या तयार करण्यात आल्या आहेत़ मात्र, हा निधी खर्च करण्यासाठी ज्या प्रशासकीय नियमांचे मार्गदर्शक सूचनांचे धोरणात्मक शासन निर्णय जिल्हा परिषदेला अजूनही मिळालेला नाही़ त्यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्हा नियोजन समितीशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे़ मात्र, त्याबाबत हा निधी खर्च करण्याबाबत जिल्हा नियोजनकडून अद्याप शासन निर्णय प्राप्त न झाल्याने हा निधी जिल्हा परिषदेकडून पडून आहे़ त्यामुळे शासन निर्णय केव्हा येणार आणि निधी कधी खर्च करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शाळा दुरूस्ती व संरक्षण भिंत या दोन महत्वाच्या विषयांवरील अंतिम प्रस्तावाच्या याद्या तयार करण्यात आल्या असल्याने आता पुढील निर्णयाकडे लक्ष आहे. (शहर वार्ताहर)