लांजातून ६२ बसफेऱ्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:52+5:302021-06-18T04:22:52+5:30
लांजा : आंतरजिल्हा बसफेऱ्यांना परवानगी मिळताच लांजा आगारातून पुन्हा बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत़ लांजा तालुक्यात साेमवारपासून ६२ ...
लांजा : आंतरजिल्हा बसफेऱ्यांना परवानगी मिळताच लांजा आगारातून पुन्हा बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत़ लांजा तालुक्यात साेमवारपासून ६२ बसफेऱ्या सुरू झाल्याची माहिती लांजा आगारप्रमुख संदीप पाटील यांनी दिली़
मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तालुक्यातील ग्रामीण भागातील बस अटी-शर्तींवर सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी ३ जूनपासून आठ दिवसाचा कडक लाॅकडाऊन जाहीर केल्याने एस़ टी़ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा आगारातून एस़ टी़ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. लांब पल्याच्या मार्गावर अक्कलकोट व कल्याण- मुंबई अशा दोन फेऱ्या तर तालुक्यातील ग्रामीण भागात एकाच मार्गावरील अनेक गावांना जोडणाऱ्या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शाळांसाठी सुरू करण्यात आलेल्या बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
सद्यस्थितीत लांजा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील बसफेऱ्यांना मान्यता देत लांब पल्ल्याच्या व ग्रामीण फेऱ्या सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. त्यानुसार लांजा तालुक्याच्या ग्रामीण भागात सोमवारपासून लालपरी धावताना दिसून आली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी दिलासा मिळाला आहे.