काेराेनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ६२७ ग्रामसेवक कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:31 AM2021-05-14T04:31:06+5:302021-05-14T04:31:06+5:30
रत्नागिरी : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत गावपातळीवर कोरोना योद्ध्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक पार पडत आहेत. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींतील ६२७ ग्रामसेवक ...
रत्नागिरी : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत गावपातळीवर कोरोना योद्ध्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक पार पडत आहेत. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींतील ६२७ ग्रामसेवक कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यापासून ते ग्रामस्थांना लागणाऱ्या सोयीसुविधांसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी ग्रामसेवकांना शाब्बासकीची थाप दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगला परिणाम जिल्ह्यात जाणवत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून, त्यावर नियंत्रण ठेवताना प्रशासनालाही कसरत करावी लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाडी-वस्तीवर झाला आहे. आरोग्य यंत्रणा पोचविण्यासाठी ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कोरोनाबाधितांचा शोध घेणे हा मुख्य उद्देश असून गृह भेटीतून प्रचार व प्रसारही केला जातोय. यामध्ये प्रशासकीय यंत्रणा व ग्रामस्थ यांच्यात ग्रामसेवकांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरत आहे. लोकप्रतिनिधी, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्याबरोबरीने ग्रामसेवकही या पथकात काम करत आहेत.
गावात योजना राबविण्यात हीच यंत्रणा सर्वात महत्त्वाची ठरत आहे. आतापर्यंत होम आयसोलेशन, कंटेन्मेंट झोन बनविण्यापासून ते अगदी कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती शासनाकडे पाठविण्यापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुक्त गावे ठेवण्यासाठी ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. गावांसह बाजारपेठ परिसरात सॅनिटायझर, घरोघरी धान्य वाटप, परजिल्ह्यातून येणाऱ्या मजुरांना राहण्याची व्यवस्था अशा प्रकारची कामेही ग्रामसेवकांमार्फत सुरू आहेत.
---------------------------
ग्राम कृती दलाची भूमिका महत्त्वाची
जिल्हा दौऱ्याच्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी गावपातळीवर सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामसेवकांसह ग्राम कृती दलांनी पहिल्या लाटेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याप्रमाणे सध्या माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नातून ही लाट थोपवण्यास मदत होईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.