जिल्ह्यातील ८७ केंद्रांवर ६५,८४२ जणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:26+5:302021-04-01T04:32:26+5:30
रत्नागिरी : ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तिंना कोरोना लस देण्यात येत आहे. शहरातील झाडगाव येथे दोन सत्रात लसीकरण सत्र सुरू ...
रत्नागिरी : ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तिंना कोरोना लस देण्यात येत आहे. शहरातील झाडगाव येथे दोन सत्रात लसीकरण सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता केंद्रावर नागरिकांना लसीचा लाभ घेता येणार आहे. या नागरी आरोग्य केंद्रात आतापर्यंत ३११५ जणांनी लाभ घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ८७ केंद्रांमध्ये आतापर्यंत एकूण ६५,८४२ लोकांनी लाभ घेतला आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड-१९चे रुग्ण वाढत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी प्रभावी अस्त्र कोविड लसीकरण हे आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कोविड लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. शहरातील झाडगांव येथील नागरी आरोग्य केंद्रात दोन सत्रात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागात लसीकरण सत्रे सुरु करण्यात आली आहेत. नागरी आरोग्य केंद्र, झाडगाव, तालुका रत्नागिरी येथे दोन सत्रात कोविड लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत.या केंद्रात कोवॅक्सिनची लस सकाळी ९ ते दुपारी १२.३०, तर कोविशिल्ड दुपारी १.३० ते सायंकाळी ५ या वेळेत दिली जात आहे.
कोरोना लस आता ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तिंना देण्यात येत असून, कोमॉर्बिडीटी असलेल्या व्यक्तिंनादेखील ही लस देण्यात येत आहे.
शहरातील नागरिकांनी नागरी आरोग्य केंद्र, झाडगांव येथील दोन्ही सत्रात होणाऱ्या कोविड लसीकरण सत्रांचा लाभ घ्यावा. तसेच जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात सुरु करण्यात आलेल्या कोविड लसीकरण सत्रांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
चौकट
कोविड लस ही डाव्या हाताच्या दंडावर घेतली जाते. लसीचे दोन डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर मळमळ होणे, थोडा ताप येणे ही संभाव्य लक्षणे काही लोकांमध्ये दिसून येतात. लस घेतल्यामुळे आजाराची तीव्रता कमी होते व मृत्यूचा धोका टळतो. मात्र, ही लस घेतली म्हणजे कोविडपासून आपण १०० टक्के सुरक्षित झालो असे नाही. तर कोरोना आजाराची तीव्रता कमी करण्याचा एक प्रभावी उपाय आहे. त्यामुळे दोन व्यक्तींमधील अंतर १ मीटरपेक्षा जास्त ठेवणे, मास्क वापरणे व वारंवार हात धुणे या बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे.
डाॅ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी.