शहर विकासाच्या ६८ कोटींच्या आराखड्याची २६ कोटींवर घसरण
By admin | Published: February 12, 2015 11:56 PM2015-02-12T23:56:33+5:302015-02-13T00:58:03+5:30
या आराखड्याबाबत सदस्यांशी कन्सल्टन्सीने विस्ताराने चर्चा केलीच नाही. त्यामुळे निसर्गला ६० लाख सल्ला फी कसली द्यायची? एक रुपयाही देऊ नये, अशी मागणी
रत्नागिरी : शहराच्या विकासाची आस लावून बसलेल्या रत्नागिरीवासीयांना शहर विकास आराखड्याने मोठाच धक्का दिला आहे. निसर्ग कन्सल्टन्सी, तत्कालिन प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच तयार केलेला ६८ कोटीचा शहर विकास आराखडा (डी. पी. आर.) २६ कोटींवर आला आहे. या आराखड्याबाबत सदस्यांशी कन्सल्टन्सीने विस्ताराने चर्चा केलीच नाही. त्यामुळे निसर्गला ६० लाख सल्ला फी कसली द्यायची? एक रुपयाही देऊ नये, अशी मागणी आज झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुख्याधिकारी एम. बी. खोडके तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. नगरसेवक अशोक मयेकर म्हणाले, निसर्ग कन्सल्टन्सीचे प्रतिनिधी एक दिवस येऊन अहवाल देतात, चर्चा होत नाही. या एजन्सीने नगरपरिषदेची फसवणूक केली असून, त्यांना ६० लाख कसले द्यायचे. अहवालात केवळ डांबरीकरणाचीच कामे असून पदपथ, पथदीप यांसारख्या कामांच्या निविदा कुठे आहेत, निविदा का निघत नाहीत, असे सवालही त्यांनी केले. त्यानंतर उमेश शेट्ये यांनीही चर्चेत सहभागी होताना सांगितले की, पालिकेचा डीपीआर ६८ कोटींचा होता. परंतु निकषांचा अभ्यास न करता हा डीपीआर बनवला गेला. डांबरीकरणासाठी १२ मीटर्स रुंदीच्या रस्त्यांचा समावेश करायचा होता. परंतु त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांचाही समावेश करून ६८ कोटींचा डीपीआर शासनाकडे पाठवण्यात आला. परिणामी १२ मीटर्स रुंदीच्या रस्ता डांबरीकरणाचा निधी मंजूर झाला व डीपीआर २६ कोटींवर आला. नगरसेवक राहुल पंडित म्हणाले, एजन्सीचे काम चांगले नाही, त्यामुळे त्यांना रुपयाही देऊ नये. दरम्यान, रहाटागर येथील सखल रस्त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून डबके होते. तेथे भराव करून रस्त्याची उंची वाढविण्यासाठी ७८ लाखांचा नवीन प्रस्ताव तयार केल्याची माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी दिली. डीपीआरमध्येच हे काम घेता आले असते. परंतु तसे न झाल्याने आता नगरपरिषद फंडातून हे काम करावे लागत असल्याचे ते म्हणाले. यावेळच्या चर्चेत प्रदीप तथा बंड्या साळवी, विनय मलुष्टे, शिल्पा सुर्वे, प्रज्ञा भिडे, बाळू साळवी, राहुल पंडित, आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
रुंदीकरणाआधी डांबरीकरण?
रत्नागिरीत डांबरीकरणाची कामे होत असल्याने नागरिक समाधानी आहेत. परंतु डांबरीकरणासाठी १८ मीटर्स रुंदीचा रस्ताच नाही, तर साळवी स्टॉप ते दांडा फिशरीजपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण कसे होणार? असा सवाल अशोक मयेकर यांनी केला. त्यावर रुंदीकरण वाळूने होणार व नंतर डांबरीकरण होणार, असा उपरोधिक टोला नगरसेवक मधुकर घोसाळे यांनी लगावला. त्यामुळे सभागृहात हंशा पिकला.
महिला नगरसेवकांत जुंपली...
जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम प्रत्येक प्रभागात झाला पाहिजे, असा एका गटाचा सूर, तर शिवाजी स्टेडियममध्येच हा कार्यक्रम घ्यावा, असा दुसऱ्या गटाचा सूर असल्याने शिवसेना व भाजपाच्या महिला नगरसेवकांमध्ये सभागृहातच जुंपली. प्रमोद महाजन संकुल व सावकर नाट्यगृह असे दोन ठिकाणी कार्यक्रम घ्यावेत, असा प्रस्तावही पुढे आला. त्यावर शिवाजी स्टेडियम का नको, असा प्रस्ताव आल्याने गुंता वाढतच गेला.
रत्नागिरी नगर परिषद सभेतील ठळक निर्णय...
माळनाका येथे ७१ क्रमांकाच्या आरक्षित जागेवर १ कोटी १० लाखांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तारांगण उभारणार. १० लाख निधी प्राप्त. १ कोटी १५ दिवसांत मिळणार.
७१ नंबर आरक्षणातील मुख्याधिकारी निवासस्थान, ठाकरे उद्यान व बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे ठराव रद्द.
माळनाका येथील स्कायवॉक होणार नसेल, तर त्याचा निधी पालिकेकडे दुसऱ्या कामासाठी वळवावा.
संस्कृती ग्रुप, रत्नागिरीच्या कोकण सुंदरी उपक्रमाला अनुदान देण्याच्या निर्णयाला मंजुरी.