पावसामुळे लागवडीची ६८ कामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:22 AM2021-07-21T04:22:14+5:302021-07-21T04:22:14+5:30
रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावर पेरण्यांची कामे उरकल्याने, या वर्षी भात लागवडीच्या कामाला लवकर प्रारंभ झाला. सुरुवातीपासून चांगला पाऊस बरसत ...
रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावर पेरण्यांची कामे उरकल्याने, या वर्षी भात लागवडीच्या कामाला लवकर प्रारंभ झाला. सुरुवातीपासून चांगला पाऊस बरसत आहे. मात्र, मध्येच पावसाने दडी मारली होती, परंतु पुन्हा पावसाने दमदार बरसण्यास प्रारंभ केला असल्याने, रखडलेल्या लागवडीच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत ६८ टक्के लागवडीची कामे पूर्ण झाली आहेत.
रखडलेल्या पावसामुळे भात रोपे वाळू लागली होती. मात्र, पावसामुळे भात रोपांना संजीवनी प्राप्त झाली आहे. लागवडीची कामे मात्र अंतिम टप्प्यात सुरू आहे. जिल्ह्यात ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याचे उद्दिष्ट असताना, ५५ हजार ५४०.३० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. नागली पीक १४ हजार ३९३.८७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येत असताना, आतापर्यंत ६८५४.७५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तूर लागवड ७१८.५० हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित असताना, ६३ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. इतर पिके १७९०.८७ लागवड करण्यात येत असताना, ७१४.१४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात लागवडीच्या कामांची लगबग सुरू आहे. पारंपरिक नांगर, तसेच पॉवर टिलरद्वारे नांगरणी केली जात आहे. पॉवर टिलरमुळे नांगरणीचे काम कमी वेळेत व कमी श्रमात पूर्ण होत आहे. मजुरांची उपलब्धता होत नसल्यामुळे सामूहिक पद्धतीने लागवडीची कामे उरकण्यात येत आहे. गेल्या आठवडयापासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने कामाचा वेग वाढला आहे. जिल्ह्यात हळवे, निमगरवे व गरवे भात लागवड करण्यात येत असून, येत्या आठवडाभरात भात लागवडीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
उत्पन्न वाढविण्यासाठी सुधारित व संकरीत बियाण्यांचा वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यात भातासह नागली, तूर, इतर पिकांची लागवड सुरू असून, पावसामुळे पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाचला आहे.