कोरेगाव येथे ७ घरफोड्या
By Admin | Published: December 14, 2014 12:07 AM2014-12-14T00:07:42+5:302014-12-14T00:07:42+5:30
लाखोंचा ऐवज लंपास : रोख रकमेसह दागिनेही चोरीस; घरमालक मुंबईचे
खेड : तालुक्यातील कोरेगाव येथील विठ्ठलवाडी आणि गणेशनगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पहाटेच्या दरम्यान तब्बल ७ बंद घरे फोडून चोरट्यांनी दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घरांचे मालक मुंबईत नोकरीनिमित्त राहतात. चोरट्यांना पकडण्यासाठी रत्नागिरीहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. चोरटे हे कोरेगाव परिसरातील तसेच तालुक्यातील माहीतगार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोरेगावचे पोलीसपाटील मोरे यांनी पोलिसांत ही खबर दिली. कोरेगाव विठ्ठलवाडी येथील ३ बंद घरे आणि गणेशनगरमधील ४ बंद घरे फोडण्यात आली़ विजया बाळकृष्ण मोरे यांच्या घरातील कपाट फोडून त्यातील ४ हजार ५०० रुपये रोकड लांबवली आहे, तर नीलेश मनोहर मोरे यांच्या बंद घरातील २ लोखंडी कपाटे फोडण्यात आली आहेत़ त्यातील एका कपाटातील १ हजार रुपये रोकड लंपास केली आहे. ही दोन्ही घरे मागील बाजूच्या दाराचे कडी कोयंडे काढून फोडली आहेत.
श्रीधर गुणाजी सावंत यांच्या घरातील लोखंडी कपाट फोडण्यात आले आहे. मात्र, यातील मौल्यवान अशी कोणतीही वस्तू नव्हती. दत्ताराम रामचंद्र कोकाटे यांच्या घराच्या दर्शनी भागाचे कुलुप तोडण्यात आले आहे. येथूनच चोरट्यांनी घरात प्रवेश केला आहे. कपाटे फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात या चोरट्यांना यश आले नाही. शशिकांत राजाराम मोरे यांच्या बंद घरातील लोखंडी कपाटे फोडण्यात आली.
लक्ष्मण श्रीपत मोरे यांच्या घरातील कपाटात ठेवलेले ६ ग्रॅम सोने, ३ अंगठ्या आणि चेनमधील सोन्याचे पान (लॉकेट) तसेच लोखंडी कपाटातील ६ हजार ५०० रुपये रोकड आणि पेटीतील १२ हजार रोकड गायब झाली आहे़ कपाटात ठेवलेले ७ ते ८ चांदीच्या वस्तूही चोरीस गेल्या आहेत. शाहू शिवराम मोरे यांच्या बंद घरातील लोखंडी कपाट फोडण्यात आली आहेत. तालुक्यातील सुसेरी गावातही अशा प्रकारची चोरी झाली असून, यावेळी त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, खेड पोलीस स्थानकातील परीविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पांडे यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद पवार आणि पोलीस कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रत्नागिरीहून श्वानपथक मागविण्यात आले असून, सायंकाळी उशिरापर्यंत ते खेडमध्ये दाखल होणार आहे. (प्रतिनिधी)
चोरी कितीची ?
जेथे चोऱ्या झाल्या त्या बंद घराचे मालक मुंबईत वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे चोरीस गेलेल्या मालमत्तेची शहानिशा होऊ शकली नाही. पोलिसांनी या मालकांशी संपर्क साधला असून, रात्रीपर्यंत ते येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़
पोलिसांसमोर आव्हान
तालुक्यात तब्बल ७ चोऱ्या झाल्याने पोलिसांसमोरचे आव्हान आणखी एकदम गंभीर बनले आहे. अगोदरच्या चोऱ्यांचा तपास लावताना पोलिसांच्या नाकीनऊ आले असतानाच आता एकाच गावातील या चोरीच्या सत्रामुळे अवघ्या तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.