राजापूर पंचायत समिती इमारतीसाठी ७ कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:20+5:302021-04-08T04:31:20+5:30
राजापूर : राजापूर तालुक्याचा प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या पंचायत समितीच्या विविध ...
राजापूर : राजापूर तालुक्याचा प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या पंचायत समितीच्या विविध विभागांची विखुरलेली कार्यालये एकाच छताखाली यावीत, याकरिता नवीन इमारतीचा सुमारे ७ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांमध्ये जागेचा प्रश्नही निकाली लागणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सह्याद्रीपासून अरबी समुद्रापर्यंत विस्तारलेल्या राजापूर तालुक्यात २४० महसुली गावे असून १०१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीचे पालकत्व करणाऱ्या पंचायत समितीचा कारभार मात्र अत्यंत जुन्या इमारतीमधून हाकला जात आहे. ही इमारत सुमारे ६ हजार २४८ चौरस फूट आकाराची असून, सदरची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावर आहे. अन्य शासकीय कार्यालये हायटेक होत असताना सुमारे ३८ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली राजापूर पंचायत समितीच्या इमारतीची केवळ डागडुजी केली जात आहे. या इमारतीचा काही भाग मोडकळीला आला असून केव्हाही दगा देईल, अशी स्थिती आहे.
सद्य:स्थितीत या इमारतीत शिक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची कार्यालये आहेत. मात्र, पंचायत समितीशी संलग्न असलेल्या एकात्मिक महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग, जिल्हा परिषद बांधकाम व सार्वजनिक बांधकाम आदींची कार्यालये मात्र अन्य इमारतींमध्ये आहेत. पंचायत समितीच्या विविध विभागांची कार्यालये विखुरलेल्या स्वरूपात असल्याने कामासाठी येणाऱ्या लोकांना या इमारतींमध्ये खेपा माराव्या लागतात. त्यामुळे लोकांच्या वेळेचा आणि श्रमाचा अपव्यय होतो. त्यामुळे ही सर्व कार्यालये एकाच छताखाली यावीत, अशी मागणी तालुकावासीयांतून मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. पंचायत समितीची सर्व कार्यालये एकाच इमारतीत यावीत, याकरिता सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, पंचायत समितीची कार्यालये असलेली जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे असल्याने नव्या इमारतीला अडसर ठरत होती. त्यामुळे सदरची जागा जिल्हा परिषदेच्या नावे करण्याच्या दृष्टीने बांधकाम विभागाकडून जागेची मोजणी करण्यात आली असून एकूण १.१० हेक्टर जागेपैकी १६ गुंठे जागा महसूल विभागाच्या गोडाउनसाठी सोडून उर्वरित जागा जिल्हा परिषदेच्या नावे करण्याची कार्यवाही सुरू आहे.
येत्या महिनाभरात सदरची कार्यवाही पूर्ण होण्याची शक्यता आहे. आमदार राजन साळवी यांच्या प्रयत्नातून आर्किटेक्चरची नियुक्ती करून पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन इमारतीचा सुमारे ७ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या पंचायत समितीच्या नव्या इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा केली जात आहे.