गणपतीपुळे विकासासाठी ७० कोटींचा आराखडा
By admin | Published: February 2, 2016 11:49 PM2016-02-02T23:49:15+5:302016-02-02T23:49:15+5:30
अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदेश
रत्नागिरी : जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचा विकास करून जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुमारे ७० कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केली होती.
वित्त व नियोजनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ (सर्वसाधारण)ची राज्यस्तरीय बैठक सोमवारी मंत्रालयात पार पडली. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आदी उपस्थित होते. या बैठकीत वायकर यांनी विविध गोष्टींची मागणी केली. यात जिल्ह्यामध्ये १०५९ साकव असून, सद्य:स्थितीत ५९७ साकव नादुरुस्त आहेत. त्यासाठी सुमारे ७७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याने आवश्यक निधी देण्याची मागणी करण्यात आली.
त्यानुसार नादुरुस्त, तसेच प्रस्तावित साकवांची पाहणी करून निधी देण्यात येईल, असे आश्वासन वित्त व नियोजनमंत्री मुनगंटीवार यांनी पालकमंत्र्यांना दिले.
रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये समुद्रकिनारा विकसित करण्यासाठी नऊ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.
याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी थिबा पॅलेस ते भाट्ये बीच रोपवे, परशुराम ते गोवळकोट किल्ला रोपवे, शासकीय रोपवाटिकांची अत्याधुनिक नर्सरी, शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्यासाठी बियाणे, अवजारे, कीटकनाशके, स्टार, शौचालये, आदी विविध मागण्याही पालकमंत्री वायकर यांनी केल्या आहेत.
(प्रतिनिधी)
‘‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
अर्थमंत्र्यांनी या बैठकीत माता रमाबाई आंबेडकर यांच्या वणंद (ता. दापोली) या जन्मस्थानाच्या विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपयेही मंजूर केले आहेत. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही अर्थमंंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दि. १ सप्टेंबर २०१५ आणि २० नोव्हेंबर २०१५ या दिवशी ‘लोकमत’ने रमार्इंच्या गावातील गैरसोयी आणि तिथे अपेक्षित असलेल्या सुविधांचा ऊहापोह केला होता. त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली होती. आता त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे.