रत्नागिरीतील नळपाणी योजनेचे ७० टक्के काम मार्गी : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:33 AM2021-08-27T04:33:55+5:302021-08-27T04:33:55+5:30

रत्नागिरी : शहरातील नळपाणी योजनेचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे तातडीने पूर्ण ...

70% work of piped water project in Ratnagiri completed: Uday Samant | रत्नागिरीतील नळपाणी योजनेचे ७० टक्के काम मार्गी : उदय सामंत

रत्नागिरीतील नळपाणी योजनेचे ७० टक्के काम मार्गी : उदय सामंत

Next

रत्नागिरी : शहरातील नळपाणी योजनेचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत. शहरातील अकरा हजार जोडण्यांना सव्वादोन कोटींचे मीटर नगर परिषद स्वखर्चाने बसविणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये उपस्थित होते.

पावसामुळे शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम रखडले होते. मात्र, त्यासाठी वर्कऑर्डर काढण्यात आली असून, पावसाळ्यानंतर तातडीने रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. आचारसंहितेचाही अडसर त्यासाठी भासणार नसल्याचे सांगितले. १४ कोटी २८ लाख ५४ हजार रुपयांची नगर परिषद इमारतीची निविदा तयार करण्यात आली असून, सोमवारी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली जाणार आहे.

मारुती मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी एक कोटी २८ लाख रुपये मंजूर असून, जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या माध्यमातून हे सुशोभीकरण केले जाणार आहे.

छत्रपती शिवाजी स्टेडियमची डागडुजी, तसेच स्टेडियम परिसरातील अन्य दुरुस्तीही केली जाणार आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठीही निधी मंजूर असून, मुख्य रस्त्याबरोबर अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. मुरुगवाडा येथील समाजमंदिर दुररुस्तीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. लोकमान्य टिळक स्मारक दुरुस्तीचे काम जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या माध्यमातूनच केले जाणार आहे. तारांगणाचे काम अंतिम टप्प्यात आहे, असेही ते म्हणाले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, या महाविद्यालयात सुरुवातीला पाच अभ्यासक्रमांचे अध्यापन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. १८ ते २९ वयोगटातील तरुणांसाठीच्या लसीकरणाचा अभिनव उपक्रम जिल्हा परिषद गटामध्ये सुरू असून, त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.

................

कारवाई कायदेशीरच

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची कारवाई कायदेशीरच आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. पालकमंत्री अनिल परब यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: 70% work of piped water project in Ratnagiri completed: Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.