लॉकडाऊनच्या काळात कलाध्यापकांनी साकारल्या ७०० कलाकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:38 AM2021-06-09T04:38:55+5:302021-06-09T04:38:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातील कलाध्यापकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत स्वतःला कॅनव्हास आणि रंगांच्या दुनियेत गुंतवून घेतले असून, या ...

700 works of art created by art teachers during the lockdown | लॉकडाऊनच्या काळात कलाध्यापकांनी साकारल्या ७०० कलाकृती

लॉकडाऊनच्या काळात कलाध्यापकांनी साकारल्या ७०० कलाकृती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यातील कलाध्यापकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत स्वतःला कॅनव्हास आणि रंगांच्या दुनियेत गुंतवून घेतले असून, या काळात जिल्ह्यातील १५० कलाध्यापकांनी ७००पेक्षा अधिक कलाकृती साकारल्या आहेत. एवढेच नव्हे तर कलाध्यापकांच्या या सर्व कलाकृती सर्वांना पाहता याव्यात आणि कलेतील बारकाव्यांचा आनंद लुटता यावा, यासाठी एक यू ट्यूब चॅनेलही सुरु करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघटनेचे सचिव इम्तियाज शेख यांनी यासाठी घेतलेली अथक मेहनत कलाध्यापकांना नवी ऊर्जा देईल, असे गौरवोद्गार अध्यक्ष बबन तिवडे यांनी यावेळी काढले.

कलाकार आपल्या कलाकृतीतून स्वतःच्या अंतर्मनाचे समाधान तर करत असतोच मात्र रंग रेषांच्या या दुनियेतून तो कलाकृती पाहणाऱ्या प्रत्येकाला एक आनंददायी अनुभूती देत असतो. कलाकारांच्या या कलाकृती सर्व कलाप्रेमींना पाहता याव्या, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कलाशिक्षकांचे एक स्वतंत्र यू ट्यूब चॅनेल असावे आणि या माध्यमातून कलाकारांच्या कलाकृती जगभरातील रसिकांना पाहता याव्यात, या उदात्त विचारातून रत्नागिरी येथील कलाशिक्षक इम्तियाज शेख यांनी एक यू ट्यूब चॅनेल सुरु करण्याची संकल्पना मांडली. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बबन तिवडे, माजी अध्यक्ष तुकाराम दरवजकर, खजिनदार राजन आयरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांजवळ याबाबत चर्चा केल्यानंतर सर्वांनीच एकमताने ही संकल्पना उचलून धरली.

संघटनेचे सचिव शेख यांनी याची तयारी सुमारे ४ महिन्यांपूर्वीच केली होती. जिल्ह्यातील कलाध्यापकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रत्येक कलाध्यापकाने दररोज किमान एक कलाकृती चितारण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत कलाध्यापक एकच काय तीन - चार कलाकृती चितारुन ग्रुपवर टाकू लागले. आठवड्याला सर्वाधिक कलाकृती चितारणाऱ्या कलाध्यापकाचा ‘आठवड्याचा उत्तम कलाकार’ म्हणून प्रमाणपत्र देऊन जिल्हा कलाध्यापक संघटनेतर्फे गौरव केला जाऊ लागला. यामुळे कलाकारांना नवी ऊर्जा मिळाली आणि चार महिन्यांच्या कालावधीत जवळपास ७०० कलाकृती चितारल्या गेल्या. यामुळे जिल्ह्यात कलाकृती साकारण्याचा एक नवा विक्रमही घडला.

-------------------------

निवडक कलाकृतींचे लवकरच प्रदर्शन

गेल्या चार महिन्यांत साकारलेल्या ७००पेक्षा अधिक कलाकृतींपैकी निवडक कलाकृतींचे कोरोना कालावधी संपल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी प्रदर्शन भरविण्याचा मानसही जिल्हा कलाध्यापक संघटनेने व्यक्त केला आहे. कोरोना कालावधीत कलाध्यापकांनी बहुसंख्य कलाकृती साकारताना विद्यार्थ्यांसाठी कलेबाबतचे विविध आदर्शवत असे उपक्रमही राबवले आहेत.

Web Title: 700 works of art created by art teachers during the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.