राजापूर, लांजा, रत्नागिरीतील ७१० कुटुंबियांना पाेहाेचले ‘रमजान किट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:39 AM2021-04-30T04:39:42+5:302021-04-30T04:39:42+5:30
लांजा : लाॅकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या लोकांची उपासमार होऊ नये, यासाठी लांजा येथील मुस्लिम वेल्फेअर सोसायटी या संस्थेने राजापूर, ...
लांजा : लाॅकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या लोकांची उपासमार होऊ नये, यासाठी लांजा येथील मुस्लिम वेल्फेअर सोसायटी या संस्थेने राजापूर, लांजा, रत्नागिरी येथील ७१० कुटुंबियांना अन्न-धान्याच्या किटचे वाटप केले. गरजूंच्या मागणीनुसार त्यांना हे ‘रमजान किट’ घरपाेच देण्याची व्यवस्था या संस्थेने सुरू केली आहे.
मुस्लिम वेलफेअर सोसायटी या संस्थेची स्थापना १४ फेब्रुवारी २०१९ रोजी लांजा येथे झाली. सोसायटी संस्थापकीय सदस्य रफिक नाईक व त्यांचा मुलगा अकील नाईक यांनी सामाजिक, शैक्षणिक काम करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेचे सल्लागार महमंद रखांगी, अनिस मुक्री, समीर घारे, ताज मुजावर, रफिक नाईक आणि फाॅरेन फंड रेझर अन्वर कासू या सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
गतवर्षी लाॅकडाऊनच्या काळात मुस्लिम वेल्फेअर सोसायटीने १,२०० धान्याच्या किटचे वाटप केले होते. दफन तसेच अंत्यविधी न घाबरता त्यांनी पार पाडले होते. आताही सोसायटी पर्वतासारखी समाजासाठी उभी असून, घेतलेला वसा पार पाडत आहे. सध्या रमजानचा महिना असल्याने तसेच लाॅकडाऊनमुळे गोरगरीब लोकांना अन्नधान्य उपलब्ध होत नसल्याने संस्थेने ‘रमजान किट’च्या निमित्ताने अन्नधान्याचे अखंडित वाटप सुरू केले आहे. आतापर्यंत राजापूर, लांजा व रत्नागिरी याठिकाणी ७१० किटचे वाटप केले आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार धान्याचे किट घरपोच दिले जाते. लाॅकडाऊन असेपर्यंत गोरगरीब लोकांची सेवा अशीच सुरु राहणार असल्याची माहिती सोसायटीकडून देण्यात आली.
मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक नाईक, कार्याध्यक्ष अकील नाईक, सचिव राजू नाईक, खजिनदार सईद खान, साटवली प्रभाग अध्यक्ष अब्दुल बरमारे, नुरा काझी, हुसेन ठाणेदार, अरिफ घारे, आयेशा बागवान, दिलशाद नाईक तसेच अखंडित माल पुरवठा करणारे रघुनाथ कोपरे आणि आपला बाजारचे मालक उदय सावंत यांच्या सहकार्याने ही सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.