जिल्ह्यातील ७६.५८ टक्के विद्यार्थी घेताहेत ऑनलाईन धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:34 AM2021-09-25T04:34:38+5:302021-09-25T04:34:38+5:30
रत्नागिरी : कोरोनामुळे जिल्ह्यात ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद व अनुदानित, विनाअनुदानित मिळून सर्व शाळांची एकूण १ ...
रत्नागिरी : कोरोनामुळे जिल्ह्यात ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद व अनुदानित, विनाअनुदानित मिळून सर्व शाळांची एकूण १ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी संख्या असून, त्यापैकी १ लाख १६ हजार ५८५ विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. ३५,६६१ विद्यार्थ्यांचे अन्य माध्यमातून ऑफलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७६.५८ टक्के असून, ऑफलाईनचे प्रमाण २३.४२ टक्के आहे.
यावर्षी जूनपासून ऑनलाईन वर्ग सुरू झाले. मात्र, कोरोना नसलेल्या ६० गावांतून प्रत्यक्ष वर्ग भरविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील २,५७४ प्राथमिक व ६२८ खासगी (अनुदानित, विनाअनुदानित) शाळा आहेत. ६५०५ प्राथमिक शिक्षक तर ४२१५ खासगी शाळांमधील शिक्षक अध्यापन करीत आहेत. जूनपासून ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी नेटवर्क समस्या आहे, त्या गावात मात्र शिक्षक प्रत्यक्ष जाऊन अध्यापन करीत असून, स्वाध्याय पुस्तिकांच्या माध्यमातून अध्ययन करून घेत आहेत.
जिल्हा परिषदेचे ७१,८१० तर, खासगीचे ८०,४३६ मिळून एकूण १ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेचे ४०,७४३ विद्यार्थी व खासगीचे ३६,७६१ विद्यार्थी व्हाॅट्सॲपद्वारे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे व्हाॅट्सॲपव्दारे शिक्षण घेणारे एकूण ७७,५०४ विद्यार्थी आहेत. झूम ॲपच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे ८,९५९ व खासगीचे १८,१४४ मिळून एकूण २६,३०३ विद्यार्थी ऑनलाईन अध्यापन करीत आहेत. मोबाईल नसलेल्या मुलांसाठी दूरदर्शनवरूनही अध्यापनाचे वर्ग सुरू आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे ७,७०० व खासगीचे ५,०७८ मिळून १२,७७८ विद्यार्थी अध्यापन करीत आहेत.
ऑनलाईन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी काही शिक्षक प्रत्यक्ष गावात जावून अध्यापन करीत आहेत. स्वाध्याय पुस्तिकांद्वारे मुलांचा अभ्यास करून घेतला जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे १९,९२३ व खासगीचे १४,९३८ मिळून एकूण ३५,६६१ विद्यार्थी ऑफलाईन अध्यापन घेत आहेत.
---------------------------
शासनाच्या सूचनेनुसार ऑनलाईन, ऑफलाईन अध्यापन सुरू आहे. पालकांचेही त्यासाठी चांगले सहकार्य लाभत आहे. मात्र, नेटवर्क नसलेल्या गावात शिक्षक ग्रामस्थांच्या परवानगीने अध्यापन करीत आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडून पुढील सूचना येईपर्यंत अशाच पद्धतीने अध्यापन सुरू राहणार आहे.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी