रत्नागिरीत ७९ धाेकादायक इमारती, मरण्याची हाैस नाही पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:21 AM2021-06-10T04:21:45+5:302021-06-10T04:21:45+5:30

मेहरुन नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहरातील एकूण ७९ इमारती, घरे मोडकळीस आली आहेत. नगर परिषदेकडून संबंधित घरमालकांना ...

79 scorching buildings in Ratnagiri, there is no desire to die but ... | रत्नागिरीत ७९ धाेकादायक इमारती, मरण्याची हाैस नाही पण...

रत्नागिरीत ७९ धाेकादायक इमारती, मरण्याची हाैस नाही पण...

Next

मेहरुन नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शहरातील एकूण ७९ इमारती, घरे मोडकळीस आली आहेत. नगर परिषदेकडून संबंधित घरमालकांना स्थलांतरासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील २८ इमारतींचा काही भाग मोडकळीस आला आहे तर ५१ इमारतींचे बहुतांश बांधकाम मोडकळीस आले आहे. या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना खबरदारी म्हणून अन्यत्र स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींचे बहुतांश मालक अन्यत्र राहात असून, अनेक घरे रिकामीच आहेत. तर काही इमारतींमध्ये भाडेकरू राहात आहेत. वर्षानुवर्षे वास्तव्य असल्याने ही मंडळी येथून हलत नसल्याचे निदर्शनास येत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून दरवर्षी सर्वेक्षण करून मोडकळीस आलेल्या इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या जातात. नगर परिषदेचे कर्मचारी स्वत: जाऊन रहिवाशांना इमारत खाली करण्यासाठी नोटीस देतात. मालक नसल्यास इमारतीच्या प्रवेशव्दारावर नोटीस चिकटवली जाते. सध्या कोरोनामुळे प्रत्यक्ष जाणे शक्य नसल्याने वर्तमानपत्रातून नोटीस बजावण्यात आली आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पडझड होऊन जीवित व वित्तहानीची शक्यता असल्याने नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय अन्यत्र स्थलांतराची सूचनाही केली आहे.

रत्नागिरी शहरातील बंदर रोड येथील एक इमारत मोडकळीस आली असून, बहुतांश भाग तुटला आहे. त्यामुळे नगर परिषदेने स्थलांतराची नोटीस बजावली आहे.

रिकाम्या इमारती

जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींना पावसाळ्यात धोका असल्याने इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन करण्यात येते. शहरातील बहुतांश इमारती रिकाम्या असून, मालक अन्यत्र राहात आहेत. काही इमारतींमध्ये मात्र भाडेकरू राहात असल्याने ते अन्यत्र जात नसल्याची तक्रार आहे.

शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण दरवर्षी करण्यात येते. सर्वेक्षणानंतर जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी काळजी घेण्यासाठी नागरिकांना स्थलांतराची नोटीस देण्यात येते. कोरोनामुळे प्रत्यक्ष नोटीस देणे शक्य नसल्यामुळे वर्तमानपत्रातून नोटीस बजावण्यात आली आहे. नागरिकांनी याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

- संतोष जाधव, सहाय्यक नगररचनाकार, नगर परिषद, रत्नागिरी.

जुन्या, जीर्ण इमारती

शहरातील ५१ इमारतींचा संपूर्ण भाग तुटलेला आहे. अनेक वर्षांपूर्वीच्या या इमारती असून, मोडकळीस आल्याने अनेक मालक वर्षानुवर्षे राहत नाहीत. मात्र, इमारती उभ्या आहेत. पावसाळ्यात जीर्ण झालेला भाग ढासळत आहे. त्यामुळे लगतच्या बांधकामांना याचा त्रास होत असल्याने लगतचे इमारत मालक याबाबत तक्रार करत आहेत.

शहरातील २८ इमारतींचा काही भाग मोडकळीस आला आहे. अनेक इमारतींचे मालक त्याठिकाणी राहत नाहीत परंतु भाडेकरू राहात असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्षानुवर्षे राहात असल्याने भविष्यात कूळ म्हणून राहिल्याचा फायदा होईल, या एकमेव आशेवर ते राहतात. परंतु, पावसाळ्यात इमारतीला धोका असल्याचे सांगूनसुध्दा भाडेकरू अन्यत्र जात नसल्याने प्रशासनाकडून मात्र नोटीस दिली जाते.

कोरोना संकटामुळे यावर्षी नगर परिषदेकडून कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यास जाणे अशक्य असल्याने मोडकळीस आलेल्या इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन वर्तमानपत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. नागरिकांना भविष्यातील धोका लक्षात घेता, अन्यत्र स्थलांतरित होण्याची सूचना केली आहे. पावसाळ्यातील चार महिने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने इमारतींची पडझड होऊन दुर्घटना घडू नये, यासाठीच ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Web Title: 79 scorching buildings in Ratnagiri, there is no desire to die but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.