पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ८० कोटींचे नुकसान; नद्यांना पूर आल्याने लांजा, राजापुरात पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 12:57 PM2024-07-19T12:57:54+5:302024-07-19T12:58:17+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या जिल्ह्याला २० जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या ...
रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या जिल्ह्याला २० जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने काही ठिकाणी पाणी भरण्याच्या घटना घडल्या. आतापर्यंत जिल्ह्यात अंदाजे एकूण ८२ कोटींचे नुकसान झाले असून ४७२ दुकानांचे ८० कोटींचे नुकसान झाले आहे.
यंदा पावसाने जून महिन्यापासून सातत्य राखले आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून तर पावसाने मुसळधारेने पडण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात तर पावसाने एकही दिवस खंड पाडलेला नाही. बुधवारी दिवसभर पावसाने संततधार धरली होती. रात्रभर पाऊस सुरू होता. गुरुवारी सकाळीही जोर कायम होता. ३ वाजण्याच्या सुमारास पावसाने तासभर विश्रांती घेतली. मध्येच काहीकाळ सूर्यदर्शनही झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाच्या जोरदार सरी पडू लागल्या.
मध्यंतरी पावसाचा जोर कमी झाल्याने खेडमधील जगबुडी नदीचे पाणी ओसरल्याने धोका पातळीहून इशारा पातळीच्या वर आले होते. पण बुधवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने गुरुवारी या नदीबरोबरच काजळी नदीची पाणीपातळीही इशारा पातळीच्यावर पोहोचली आहे. तसेच पावसाबरोबर वादळी वारेही असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरे, गोठे, संरक्षक भिंती आदींच्या पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी वाढल्याने लांजा, राजापूरमध्ये पाणी भरले. सायंकाळनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला.
१ जून ते १८ जुलै या कालावधीत जिल्ह्यात झालेले नुकसान
- मृत्युची संख्या : ४
- जखमी व्यक्ती : ७
- घरे : ३३६
- गोठे : ५२
- सार्वजनिक मालमत्ता : ५८
- खासगी मालमत्ता : ४०
- मृत जनावरे : ११
- दुकाने : ४७२
- पुरामुळे स्थलांतर : ७३ कुटुंबातील ३०७ व्यक्ती
- दरडीमुळे स्थलांतर : ४ कुटुंबातील ११ व्यक्ती
- अंदाजे एकूण नुकसान : ८२,०५,७३,१८९ रुपये