रेल्वे प्रवाशांचे ८० लाख लंपास

By Admin | Published: March 24, 2016 11:20 PM2016-03-24T23:20:54+5:302016-03-24T23:38:12+5:30

तोतया पोलीस: केरळच्या ज्वेलर्सकडून पोलिसात तक्रार

80 lakh lacs of railway passengers | रेल्वे प्रवाशांचे ८० लाख लंपास

रेल्वे प्रवाशांचे ८० लाख लंपास

googlenewsNext

रत्नागिरी : पनवेलमधून केरळमध्ये ओखा एक्सप्रेसने जाणाऱ्या दोघा प्रवाशांकडून ८0 लाख रूपये लुटण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सकाळी रत्नागिरी परिसरात घडला आहे. तुमच्याकडे आरक्षण नसताना आरक्षित बोगीत कसे बसलात, असे सांगत गाडीतून खाली उतरवले व साहेबांना भेटावयाचे आहे, असे सांगत चोरट्यांनी त्यांना स्वीफ्ट गाडीने काही अंतरावर नेले. त्यांच्याकडील ८० लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्या दोघांनाही तेथेच सोडून चोरटे स्वीफ्टमधून पसार झाले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेबाबत केरळमधून गुरुवारी सायंकाळी रत्नागिरीत आलेल्या जितेंद्र हिंदूराव पवार यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून, जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार पवार यांचे वडरगा, जिल्हा कालिकत, केरळ याठिकाणी बॉम्बे ज्वेलर्स हे दुकान आहे. त्यांनी व सोने गाळणारा मित्र बाबासाहेब सनगर या दोघांनी त्यांच्याकडील कामगार श्रीराम शेंडगे व विकास शिंदे या दोघांकडे २३७६ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड मुंबई येथे विकण्यासाठी दिली होती. ती लगड या दोघांनीही मुंबईत विकली. त्याचे ६० लाख रुपये त्यांच्याकडे होते. तसेच मुंबईतील काही ज्वेलर्सनी आगाऊ म्हणून दिलेले २० लाख रुपये त्यांच्याजवळ होते. एकूण ८० लाख रोख रक्कम घेऊन दोघेही बुधवारी रात्री पनवेलमध्ये आले. ते ओखा एर्नाकुलम एक्सप्रेसच्या एस ७ या आरक्षित बोगीत बसून केरळला निघाले होते. बुधवारी पहाटे ते रत्नागिरीत आले असता दोघेजण त्यांच्याजवळ आले. आपण पोलीस असल्याची बतावणी करत सामान्य बोगीचे तिकिट असताना आरक्षित बोगीत का बसलात, या बोगीतून उतरावे लागेल, साहेबांना भेटावे लागेल, असे सांगत त्यांनी या दोघांनाही गाडीतून उतरविले व स्वीफ्ट कारमधून त्यांना काही अंतरावर नेत त्यांचे हात रुमालाने बांधले व त्यांच्याकडील ८० लाख रक्कम जबरीने चोरून नेली.
या ८० लाखांच्या रोख रकमेबरोबरच ६ हजार रुपये किंमतीचे ४ मोबाईल, रोख ४२०० रुपये असलेली दोन पाकिटे व कपडेही चोरट्यांनी लंपास केले आहेत. बुधवारच्या या प्रकाराची तक्रार जितेंद्र पवार यांनी गुरूवारी सायंकाळी दिली आहे. याप्रकरणी रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक इंद्रजीत काटकर अधिक तपास करीत आहेत. एवढी मोठी रक्कम रेल्वेने आणणे धोकादायक असताना ती का आणली गेली, खरोखरच एवढी रक्कम चोरीला गेली का? याबाबत आता चर्चेला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)




 

Web Title: 80 lakh lacs of railway passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.