कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ८२ टन काजू बी तारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:32 AM2021-05-09T04:32:56+5:302021-05-09T04:32:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांकडील ८२ टन काजू बी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांकडील ८२ टन काजू बी तारण ठेवण्यात आली आहे. शिवाय शेतमाल तारण योजनेंतर्गत ७० लाखांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
शेतमाल साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ऐन हंगामात शेतमाल एकाच वेळी बाजारात विक्रीसाठी आला तर दर गडगडतात. बाजारभाव कमी प्राप्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडते. त्यामुळे दर कमी असताना विक्री न करता, शेतमालाची साठवणूक करून तो काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीला आणल्यास जादा बाजारभाव मिळू शकतो. शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पणन मंडळाने बाजार समितीतर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, काजू बी तारणाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. कोरोना महामारीत जिल्ह्यातील काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल तारण योजनेतून ७० लाख वाटप करण्यात आले आहेत. गतवर्षी लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी काजू बी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तारण ठेवली होती. पावसाळ्यानंतर चांगला दर प्राप्त झाल्यानंतर काजू विकला. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. यावर्षी शेतमाल तारण योजनेसाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे.
कोट
शेतमाल तारण योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. अत्यावश्यक सेवेंतर्गत बाजार समितीचे काम सुरू असून, कोरोनाचे नियम पाळून बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. दररोज बाजार समितीच्या यार्डामध्ये फळे व भाजीपाला लिलाव सुरू आहे.
प्रमोद मोहिते, प्रभारी सचिव, रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती.