जिल्ह्याला ८५ टक्के खतपुरवठा

By admin | Published: April 20, 2016 10:26 PM2016-04-20T22:26:36+5:302016-04-20T22:26:36+5:30

कृषी खाते : उर्वरित खत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

85% fertilizer in the district | जिल्ह्याला ८५ टक्के खतपुरवठा

जिल्ह्याला ८५ टक्के खतपुरवठा

Next

रत्नागिरी : जिल्ह्यात भातशेती प्रामुख्याने केली जात असल्याने खरीप हंगामासाठी कृषी खात्याने २० हजार मेट्रीक टन खताची मागणी केली होती. मात्र, मागणीत एक हजाराची घट झाली असून, १९ हजार मेट्रीक टन खत मंजूर झाले आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कृषी खात्याने एक हजार मेट्रीक टन जादा खत पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
जिल्ह््यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात येते. जिल्ह्यासाठी पेरणीकरिता ७ हजार २५.९५ क्विंटल भात मंजूर झाले आहे. संकरित बियाण्यांमध्ये ८८६.०४ क्विंटल व सुधारित प्रकारचे ६१३९ क्विंटल भात उपलब्ध होणार आहे. गतवर्षी जिल्ह््याला ४३६३.९५ क्विंटल भात उपलब्ध झाले होते. गतवर्षीपेक्षा यावर्षी बियाणांसाठी अधिकची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्याला मंजुरी देखील मिळाली आहे.
रोहिणी नक्षत्रापासून काही ठिकाणी भातपेरणी करण्यात येते. धूळवाफेच्या पेरण्या प्राधान्याने केल्या जातात. उर्वरित पेरण्या या मृग नक्षत्रात होतात. एकूणच पर्जन्यमानावर पेरण्यांची स्थिती अवलंबून असते. मात्र, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कृषी खात्याने आधीच मागणी केली असून, बियाणे व खतांचे आवंटन मजूर झाले आहे. मे महिन्यात बियाणे व खते ही कृषी विभागाकडे उपलब्ध होणार असून, तातडीने खरेदी-विक्री संघामार्फत शेतकऱ्यांपर्यंत वितरीत केली जाणार आहेत.
जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. तर जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. यातील ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. नारळ व अन्य बागायतींसाठीही खते वापरण्यात येतात. भात पेरणीनंतर उगवणीपर्यंत अवधी शिल्लक राहत असल्याने बागायतींना खते घालण्याचे काम सुरू होते. त्यामुळे दरवर्षी कृषी खाते खते उपलब्ध करून देत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी युरिया १० हजार ८००, डीएपी ३००, एमओपी ४००, एसएसपी खत ८०० मेट्रीक टन मंजूर झाले आहे. उर्वरित सहा हजार मेट्रीक टन खते विविध मिश्र स्वरूपाची आहेत. गतवर्षी जिल्ह््याला युरिया खत १२ हजार ६०१.५४ मेट्रीक टन इतके मंजूर झाले होते. यावर्षी १० हजार ८०० मेट्रीक टन इतकेच मंजूर झाले आहे. युरियाचा सर्वाधिक वापर जिल्ह्यातील शेतकरी करतात. परंतु, मंजूर युरिया खतामध्ये चक्क २ हजाराची घट आहे. गतवर्षीप्रमाणे व मागणीनुसार जिल्ह्याला २० हजार मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कृषी खात्यातर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा खताचा समाधानकारक पुरवठा होईल, असा जिल्हा प्रशासनाला विश्वास आहे. (प्रतिनिधी)
कृषी विभागाला विश्वास : यंदा समाधानकारक खतपुरवठा होणार
गेल्या वर्षीपेक्षा यंदा बियाण्यांची मागणी जास्त करण्यात आली असून, त्याला मंजुरीही मिळाल्याने खताचीही जादा मागणी नोंदवण्यात आली आहे. मे महिन्यात हे खत कृषी विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ खरेदी-विक्री संघाकडे दिले जाणार आहे. त्यानंतर त्या-त्या गावी ते रवाना होणार आहे. यंदा पुरेसा खत पुरवठा उपलब्ध होईल, असा विश्वास कृषी विभागाला आहे.

Web Title: 85% fertilizer in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.