जादा अभ्यासवर्गाशिवाय मिळविले ८६.६० टक्के, अभियंता होण्याचे स्वप्न...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 06:28 PM2019-06-11T18:28:19+5:302019-06-11T18:29:28+5:30
अभ्यासाचा कोणताही जादा वर्ग नसताना केवळ वर्गात शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून पावस येथील आफान मुबीन फोंडू याने दहावीच्या परीक्षेत ८६.६० टक्के गुण मिळविले आहेत. भविष्यात अभियंता होण्याचे त्याचे स्वप्न असून, त्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेश घेणार आहे.
रत्नागिरी : अभ्यासाचा कोणताही जादा वर्ग नसताना केवळ वर्गात शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून पावस येथील आफान मुबीन फोंडू याने दहावीच्या परीक्षेत ८६.६० टक्के गुण मिळविले आहेत. भविष्यात अभियंता होण्याचे त्याचे स्वप्न असून, त्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेश घेणार आहे.
आफान सात वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. प्राथमिक शाळेत आफानचा दाखला देऊन आफानचा पहिलीसाठी प्रवेश घेऊन वडील घरी आले. मात्र नियतीला त्यांचा आनंद मान्य नव्हता, त्याच दिवशी दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. आफानला एक मोठा भाऊ असून तोही सध्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. आई फईमा ही गृहिणी असून, पतीच्या आकस्मिक मृत्यूनंतर दु:खातून स्वत:ला सावरत दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करण्याचा निर्धार केला आहे.
पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यालयाचा आफान विद्यार्थी असून, तो मुळातच हुशार आहे. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतही त्याने यश संपादन केले होते. आफानला धुळीची अॅलर्जी असल्यामुळे त्याचे डोळे प्रचंड सुजतात. अशावेळी वाचन करतानाही त्रास होतो.
परंतु त्याने संपूर्ण वर्षभर अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यश संपादन केले आहे. मराठीमध्ये ७२, संस्कृत ७८, इंग्रजी ८९, गणित ९६, सामाजिक शास्त्र ८७, विज्ञानामध्ये ८३ गुण मिळविले आहेत. यावर्षीपासून प्रथमच कृतिपत्रिका आराखड्याचा अवलंब झाला. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर स्वत:च्या शब्दात लिहून स्वमतही महत्त्वाचे होते. शाळेच्या शिक्षकांनीही कृतिपत्रिकेबाबत मार्गदर्शन केले होते. शिक्षकांच्या सूचनेचे पालन केल्यामुळेच तो यश संपादन करू शकला आहे. मुख्याध्यापक, विषय शिक्षकांचेही वारंवार मार्गदर्शन लाभले असल्याचे आफान नम्रपणे सांगतो.
विविध शालेय स्पर्धांमध्ये तो सतत सहभागी होत असे. आतापर्यंत आई व वडिलांकडील नातेवाईकांच्या पाठबळामुळेच दोन्ही भावंडे शिक्षण घेत आहेत. गणित हा विषय आफानच्या आवडीचा आहे. इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल अभियंता होण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्यासाठी कष्ट करण्याचीही तयारी आहे. दोन्ही भावंडानी उच्चशिक्षित होवून आईला आधार देण्याचे निश्चित केले आहे.
वडिलांचे छत्र हरपले
अवघ्या सात वर्षाचा असताना आफानच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे लहानपणी वडिलांचे छत्र त्याच्या डोक्यावरून हरपले. वडिलांच्या जाण्याचे दु:ख मनात साठवून तो परिस्थितीशी सामना करत होता. त्याने मिळविलेले यश निश्चितच गौरवास्पद आहे.