तवसाळ किनारी आढळली कासवांची ८७२ अंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:25 IST2021-02-22T19:24:11+5:302021-02-22T19:25:47+5:30
Wildlife Turtal Ratnagiri- गुहागर तालुक्यातील तवसाळ समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची आठ घरटी सापडली असून, यामधील ८७२ अंड्यांचे जतन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी एकाच समुद्रकिनारी कासवांची एवढी घरटी व अंडी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे कासवप्रेमींसाठी व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

तवसाळ किनारी आढळली कासवांची ८७२ अंडी
असगोली : गुहागर तालुक्यातील तवसाळ समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची आठ घरटी सापडली असून, यामधील ८७२ अंड्यांचे जतन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी एकाच समुद्रकिनारी कासवांची एवढी घरटी व अंडी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे कासवप्रेमींसाठी व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.
तवसाळ समुद्रकिनारी पूर्वी मोठ्या प्रमाणात या जातीच्या कासवांची अंडी सापडतात. कालांतरानंतर जेएसडब्ल्यू बंदर व चौगुले उद्योग समुहाचे बंदर विकसित झाल्यानंतर या ठिकाणी समुद्रातील वाहतुकीची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे मध्यंतरीच्या कालखंडात या समुद्रकिनारी मादी कासवांचे अंडी घालण्याचे प्रमाण फारच कमी झाले होते. मात्र, यावर्षी कासवप्रेमींना ही आगळीवेगळी पर्वणी निर्माण झाली आहे.
गावातील कासवप्रेमी युवक महेश सुर्वे हा गेली दोन वर्षे वनविभागाशी संबंधित आहे. या युवकाच्या लक्षात आल्यानंतर कासवांच्या अंड्यांबाबतची माहिती त्याने तातडीने गुहागर तालुक्याचे वनपाल यांना दिली. त्यानंतर वन विभागाने तातडीने सर्व अंड्यांचे जतन व संरक्षण केले आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे यावर्षी कासवांच्या प्रजननावरही परिणाम झाला आहे. किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात कासव महोत्सवही होऊ शकलेला नाही. आता अंडी सापडू लागल्याने आनंद व्यक्त होत आहे.
वन विभागाच्या समन्वयातून व सहकार्यातून दापोली तालुक्यातील केळशीच्या धर्तीवर तवसाळमध्येसुद्धा कासव महोत्सव आयोजित करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कासव महोत्सवामुळे तवसाळमधील पर्यटनात वाढ होऊन ग्रामस्थांना चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. महोत्सवानिमित्ताने पर्यटकही याठिकाणी दाखल होतील.
- नीलेश सुर्वे,
अध्यक्ष, कांदळवन समिती, तवसाळ