चिपळूण, गुहागरमध्ये ९ गावे हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:32+5:302021-05-05T04:52:32+5:30
चिपळूण : गुहागर व चिपळूण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे. ज्या गावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे, अशी गावे ...
चिपळूण : गुहागर व चिपळूण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे. ज्या गावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे, अशी गावे कोरोना ‘हॉटस्पॉट’ जाहीर करून तिथे प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत. चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील ९ गावे प्रांताधिकारी यांनी जाहीर केली आहेत.
तालुक्यातील सध्याच्या स्थितीला पिंपळी खुर्द, चिंचघरी, वालोपे, पोफळी, मांडकी बुद्रुक मुंढे तर्फे सावर्डे, पिलवली तर्फे सावर्डे ही सात गावे प्रांताधिकारी यांनी कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर केली आहेत. गुहागर तालुक्यातील मढाळ, चव्हाणवाडी व चिंद्रावळे ही ‘हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर झाली आहेत.
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने ५ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये तालुक्यात शहरासह खेर्डी व सावर्डेचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त अन्य गावांमध्ये लॉकडाऊनबाबतची मुभा देण्यात आली. परिणामी संबंधित गावांत दैनंदिन व्यवहार नियमित सुरू राहिल्याने त्याचे परिणाम हळूहळू दिसून लागले आहेत.
तालुक्यात प्रथम मांडकी बुद्रुक गाव ‘हॉटस्पॉट’ ठरला होता. येथील परिस्थिती आता पूर्वपदावर आली असून, काही रुग्ण उपचार घेत आहेत.
त्यानंतर आता पोफळी, पिंपळी खुर्द, चिंचघरी व वालोपे आदी सात गावे ‘हॉटस्पॉट’ जाहीर केली आहेत. या गावांमध्ये आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी ग्रामपंचायती व ग्रामकृतीदलाची मदत घेतली जात आहे. ज्या गावात २२ पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळतात, त्या गावाला ‘हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर केले जाते. या गावात शासकीय यंत्रणा व आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.