कासवांची ९० पिल्ले झेपावली समुद्राकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:31 AM2021-03-18T04:31:24+5:302021-03-18T04:31:24+5:30
दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर संरक्षित केलेल्या घरट्यातील दुर्मिळ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची ९० पिल्ले सुखरूप समुद्रात झेपावली. समुद्रकिनारी ...
दापोली :
तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर संरक्षित केलेल्या घरट्यातील दुर्मिळ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची ९० पिल्ले सुखरूप समुद्रात झेपावली. समुद्रकिनारी सापडलेल्या घरट्यातून १७० अंडी संवर्धित करण्यात आली असून दापोली तालुक्यात ८ हजार अंडी संवर्धित करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र शासन वन विभागाकडून ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाची संवर्धन मोहीम कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक समुद्र किनाऱ्यांंवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची अंडी संवर्धित केली जात आहे. दापोली तालुक्यातील केळशी, आंजर्ले, पाडले, पालांडे, मुरुड, कर्दे, लाडघर, कोळथरे, दाभोळ या किनाऱ्यांवर दरवर्षी कासवांची अंडी संवर्धित केली जात आहेत. यावर्षी या समुद्रकिनाऱ्यांवर ८ हजार अंडी संवर्धित करण्यात आली आहेत.
यापूर्वी ही अंडी जंगली प्राणी, भटके श्वान तसेच लोकांकडूनही नष्ट केली जात होती. परंतु, महाराष्ट्र शासन वनविभागामार्फत कासव संवर्धन मोहीम राबविण्यात येत असल्याने आता समुद्रकिनाऱ्यावर आढळलेली अंडी कासव संवर्धन केंद्रामध्ये संवर्धित केली जात आहेत. त्यातून पिल्ले तयार झाल्यावर ती पुन्हा समुद्राच्या पाण्यात सोडली जातात. गेली दहा वर्षे ही मोहीम सुरू आहे. कोरोना काळातही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धन मोहीम मोठ्या जोमाने सुरू आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड, कोळथरे, दाभोळ, केळशी, आंजर्ले समुद्र किनाऱ्यावरून यापूर्वी ४५० पिल्ले संरक्षित केलेल्या घरट्यातून समुद्रात झेपावली आहेत.
निसर्ग वादळ आणि वातावरणातील बदलामुळे यावर्षी विणीचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे.