CoronaVirus Chiplun Updates : चिपळुणात एका दिवसात तब्बल ९२ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:29 AM2021-04-14T04:29:24+5:302021-04-14T11:47:03+5:30
CoronaVirus Chiplun Updates Ratnagiri : चिपळूण तालुक्यात आता कोरोनाची दुसरी लाट थैमान घालू लागली आहे. सोमवारी आलेल्या चाचणी अहवालात चिपळूणमध्ये कोरोनाचे तब्बल ९२ नवे रुग्ण सापडले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षभरातील एकाच दिवसातील ही सर्वाधिक उच्चांकी रुग्णवाढ ठरली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली आहे.
चिपळूण : तालुक्यात आता कोरोनाची दुसरी लाट थैमान घालू लागली आहे. सोमवारी आलेल्या चाचणी अहवालात चिपळूणमध्ये कोरोनाचे तब्बल ९२ नवे रुग्ण सापडले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षभरातील एकाच दिवसातील ही सर्वाधिक उच्चांकी रुग्णवाढ ठरली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवत असताना कोकणात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होता, परंतु मार्च महिन्याच्या अखेरच्या सप्ताहापासूनच रुग्णसंख्येने वेग घेतला आणि आता तर प्रचंड वेगाने कोरोना पसरू लागला आहे. जिल्ह्यात आता दररोज २०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामध्ये चिपळूण तालुका आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरू लागला आहे.
गेल्या चार दिवसांचा आढावा घेता चिपळूण तालुक्यात दररोज ५० हून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी तब्बल ७३ नवे रुग्ण आढळून आले होते, तर सोमवारी सायंकाळी उपलब्ध झालेल्या अहवालात चक्क ९२ नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण मिळण्याची चिपळूण तालुक्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चिपळूण तालुक्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात आतापर्यंत ४०२ रुग्ण उपचार घेत होते. त्यामध्ये या ९२ रुग्णांची भर पडली आहे. या पटीतच जर रुग्णवाढ होत राहिली, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने संपूर्ण प्रशासन सतर्क झाले आहे.