बारावीचा कोकण मंडळाचा ९६.०१ टक्के निकाल; सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम
By मेहरून नाकाडे | Published: May 25, 2023 02:26 PM2023-05-25T14:26:12+5:302023-05-25T14:26:45+5:30
रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण निकाल ९६.०१ टक्के इतका लागला आहे. बारावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १.२० टक्केने निकाल घसरला आहे.
राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ पुणे मंडळाचा ९३.३४ टक्के तर कोल्हापूर मंडळाचा ९३.२८ टक्के इतका निकाल लागला आहे. पुणे व कोल्हापूर मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक कमी निकाल मुंबई मंडळाचा असून ८८.१३ टक्के इतका लागला आहे.
रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १३ हजार २२ मुलगे परीक्षेस बसले होते पैकी १२ हजार ३२० मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.६० टक्के इतके आहे. मंडळातून १३ हजार ६ मुली परीक्षेस बसल्या होत्या. पैकी १२ हजार ६७० विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.४१ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण २.८१ टक्केने अधिक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून १७ हजार १३४ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती पैकी १७ हजार ६९ परीक्षेस बसले होते. त्यातील १६ हजार २५४ विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल ९५.२२ टक्के इतका लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ८ हजार ९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पैकी ८ हजार ९५९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. आठ हजार ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९७.५१ टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही सिंधुदूर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदूर्ग जिल्ह्याचा २.२९ टक्के इतका अधिक आहे.