परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची केली तयारी, पण अचानकच 'ती'ने गळफास घेवून संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 02:03 PM2022-10-10T14:03:37+5:302022-10-10T14:03:56+5:30
तिने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे कारण गुलदस्त्यात आहे.
रत्नागिरी : परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सायली शशिकांत कांबळे असे या तरुणीचे नाव असून, ही घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी-खालगाव येथे घडली. तिच्यावर खानू येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत तिचे वडील शशिकांत रामचंद्र कांबळे (मूळ रा. खानू, ता.रत्नागिरी) यांनी पोलीस स्थानकात माहिती दिली. सायलीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तिला पुढे एमबीबीएस करायचे होते. त्यासाठी ती जॉर्जिया येथे जाणार होती. कोल्हापूर येथील विश्व या संस्थेकडून शिक्षणाकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे प्राप्त ही केली होती. मुंबईतील वरळी येथे व्हिसा काढण्यासाठी ती शुक्रवारी (७ ऑक्टोबर) वडिलांबरोबर मुंबईला गेली होती. मुंबईतून ती शनिवारी (८ ऑक्टोबर) सकाळी जाकादेवीत आली. तिने नेहमीप्रमाणे घरातील सर्व कामे केली. ती सायंकाळी आपल्या बेडरूममध्ये गेली आणि तिने सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
तिचे वडील घराच्या तळमजल्यावर झेराॅक्सचे काम करत बसले होते. काहीतरी काम असल्याने ते घराच्या पहिल्या मजल्यावर गेले. त्यावेळी त्यांना सायलीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पाहिले. मुलीला अशा अवस्थेत पाहून आई-वडिलांना धक्काच बसला. तिला तातडीने खाली उतरवून खासगी डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्यांनी तिला तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची माहिती पोलिसांना देताच रत्नागिरी ग्रामीण पाेलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून रात्री ९.३४ वाजता पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली. ग्रामीण पोलीस स्थानकाचे स्वाती राठोड, नम्रता राणे, उदय वाजे अधिक तपास करीत आहेत.
आत्महत्या का केली?
सायलीचे वडील विल्ये गावात शिक्षक असून,आई गृहिणी आहे. जाकादेवी महिला बचत गटाच्या त्या अध्यक्ष आहेत. तिची छोटी बहीण पुणे येथे शिक्षण घेत आहे. सायली बालपणापासून हुशार आणि प्रामाणिक होती. मेडिकल क्षेत्राची तिला आवड होती. त्याच क्षेत्रात तिला करिअर करायचे होते. तिच्या शिक्षणासाठी सर्व सुविधा आई-वडिलांनी पुरवली होती. मात्र,तिने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे कारण गुलदस्त्यात आहे.