प्रेयसीला भेटायला बुरखा घालून आला, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 06:07 PM2022-09-08T18:07:34+5:302022-09-08T18:08:07+5:30
एका पार्लरच्या परिसरात थांबला. संशयास्पद हालचालींमुळे तेथील एका अज्ञात व्यक्तीने मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांना फोन केला व ही बाब सांगितली.
गुहागर : विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी खेर्डी चिपळूणमधील २४ वर्षीय तरुण बुरखा घालून शृंगारतळीत आला. एका व्यक्तीने मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर विनोद जानवळकर यांनी बुरखाधारी तरुणाचा पाठलाग केला. पोलिसांच्या साह्याने शृंगारतळी बाजारपेठेत पकडले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर तरुणाने सत्य सांगितले.
विनय विजय गुरसाळे (२४, मूळ गाव आबलोली, सध्या राहणार खेर्डी, ता. चिपळूण) असे या तरुणाचे नाव आहे. याचा खेर्डीमध्ये सौंदर्य प्रसाधने विकण्याचा व्यवसाय आहे. तसेच विविध ठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजारांमध्येही विनयचे दुकान असते. व्यवसायाच्यानिमित्ताने विनय कायम शृंगारतळीमध्ये येत असे. तेव्हा येथील एका विवाहितेबरोबर विनयचे सुत जमले होते.
या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी विनय मंगळवारी सायंकाळी चक्क बुरखा घालून शृंगारतळीला आला. शृंगारतळीतील एका पार्लरच्या परिसरात विनय थांबला होता. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे तेथील एका अज्ञात व्यक्तीने मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांना फोन केला व ही बाब सांगितली. त्यानंतर विनोद जानवळकर काही कार्यकर्त्यांसह घटनास्थळी आले. आपला कोणाला तरी संशय आला आहे, हे लक्षात आल्यावर बुरखाधारी विनय आपली ॲक्टिव्हा घेऊन मळणच्या दिशेने पळाला.
जानवळकर यांनी शृंगारतळीत गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना ही माहिती दिली. बाजारपेठेत असलेल्या पोलिसांनी बुरखाधारी विनयला पकडले. पोलिसांनी आपला हिसका दाखविल्यावर विनयने आपली प्रेम कहाणी पोलिसांना सांगितली. गुहागर पोलिसांनी विनय गुरसाळेवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. विनयसह त्याच्या प्रेयसीचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.