कोकणातील समुद्रकिनारी साकारणार मोठा स्टील प्रकल्प, रत्नागिरी-रायगडमधील जागांची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 12:35 IST2023-05-13T12:34:43+5:302023-05-13T12:35:04+5:30

या प्रकल्पासाठी समुद्रकिनारी ५ हजार हेक्टर जागेची मागणी

A big steel project to be implemented on the Konkan coast, Inspection of seats in Ratnagiri-Raigad | कोकणातील समुद्रकिनारी साकारणार मोठा स्टील प्रकल्प, रत्नागिरी-रायगडमधील जागांची पाहणी

कोकणातील समुद्रकिनारी साकारणार मोठा स्टील प्रकल्प, रत्नागिरी-रायगडमधील जागांची पाहणी

रत्नागिरी : आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. कंपनी काेकणातील समुद्रकिनारी माेठा स्टील प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत मुंबई येथे बैठक झाली असून, प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी समुद्रकिनारी ५ हजार हेक्टर जागेची मागणी करण्यात आली आहे. यासाठी रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील जागांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास व पाहणी करून औद्याेगिक विकास महामंडळाला माहिती देण्यात येणार आहे.

आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून, त्यांनी नवा प्रकल्प कोकणात उभारण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर व आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि.चे राजेंद्र तोडापूरकर यांच्यात मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत कंपनीला अपेक्षित असलेल्या ठिकाणांची माहिती औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.

या कंपनीकडून ८० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही प्राथमिक चर्चा केली. महाराष्ट्रात स्टील उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची इच्छा कंपनीने व्यक्त केली होती. यासाठी ५ हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली. शिवाय बीकेसी बांद्रा येथे कंपनीच्या कॉर्पोरेट मुख्यालयासाठी जागा देण्याचीही विनंती केली आहे.

सरकारचा मानस

सध्या कोकणात विजयदुर्ग आणि जयगड बंदर (रत्नागिरी) रस्ते आणि रेल्वेने जोडण्याचा केंद्रीय दळणवळण विभागाचा प्रस्ताव आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पनवेल येथील कार्यक्रमात केली होती. त्यामुळे या कंपनीला कोकणातील किनारपट्टी भागात जागा देण्याचा सरकारचा मानस आहे. परंतु, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Web Title: A big steel project to be implemented on the Konkan coast, Inspection of seats in Ratnagiri-Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.