Accident: एसटी बसला आरामबसची धडक, १६ जखमी; अपघातानंतर आराम बसचा चालक पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:48 PM2022-08-29T18:48:24+5:302022-08-29T18:49:19+5:30
जोरदार धडकेत तीन लहान मुलांसह १६ प्रवासी जखमी झाले आहेत.
संकेत गोयथळे
गुहागर : गणेशोत्सवासाठी बोरिवलीतून गुहागर तालुक्यातील उमराठ घाडेवाडी येथे येणाऱ्या गणेशभक्तांच्या एसटी बसला खासगी आराम बसने धडक दिली. या अपघातात तीन लहान मुलांसह १६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर आराम बसच्या चालकाने पोबारा केला.
बोरिवलीतून उमराट घाडेवाडी येथे येण्यासाठी रविवारी रात्री जत आगाराची जादा बस (एमएच ११, बीएल ९३७८) सोडण्यात आली होती. सोमवारी सकाळी सातच्या सुमाराला गुहागर तालुक्यातील पिंपर जामसुद गावादरम्यान ही बस आली. त्यावेळी अरुंद रस्त्यावर जोरदार वेगाने येणाऱ्या खासगी आराम बसने (एमएच ०४, जेयू ८२८०) एसटी बसच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली.
त्यानंतर घाबरलेल्या आराम बसच्या चालकाने गाडीसह पोबारा केला. या अपघाताबाबत बसचालकाने गुहागर आगारात माहिती दिली. दरम्यान, जोरदार धडकेमुळे तीन लहान मुलांसह १६ प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील दोघांना अधिक दुखापत झाल्याने त्यांना चिपळूण येथील रुग्णालयात अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
अपघाताबाबत गुहागर आगाराकडे संपर्क साधला असता जखमी प्रवासी सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. याबाबत गुहागर पोलीस स्थानकात माहिती देण्यात आली आहे.