चिपळुणातील राड्या प्रकरणी ४०० जणांवर गुन्हा दाखल, राणे गटातील एक जण ताब्यात
By संदीप बांद्रे | Published: March 1, 2024 11:04 PM2024-03-01T23:04:57+5:302024-03-01T23:05:14+5:30
खेड जिल्हा सत्र न्यायालयात २४ जणांना अटकपूर्व जमीन मंजूर
संदीप बांद्रे, चिपळूण: मुंबई गोवा महामार्गावर पाग नाका येथे माजी खासदार निलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये १६ रोजी झालेल्या राड्याप्रकरणी ४०० जणांवर गुन्हा दाखल आहे. मात्र १५ दिवसात केवळ ११ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. यात राणे समर्थकांपैकी एकासही अटक झाली नव्हती. अशातच शुक्रवारी सायंकाळी राणे समर्थक संदेश भालेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. तसेच खेड जिल्हा सत्र न्यायालयात जाधव समर्थक २४ जणांना अटकपूर्व जमीन मंजूर केला.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील जाहीर सभेसाठी आलेल्या राणे यांचे चिपळूणात जोरदार स्वागत करण्यात आले होते. यानिमित्त आमदार जाधव यांच्या कार्यालयासमोरुन जात असताना दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडल्यानंतर राडा झाला होता. याचवेळी दोन्ही बाजूने दगडफेकीचा प्रकारही घडला. अर्थात महामार्गावरच हा सर्व प्रकार घडला. त्याचवेळी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू होता. अशाही परिस्थितीत महामार्गावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते बराचवेळ थांबून होते. दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती. यासर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या ४०० जणांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी धरपकड करीत कारवाई सुरू केली. त्यामध्ये सर्व प्रथम जाधव समर्थक असलेल्या ११ जणांना अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचवेळी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेल्या १३ जणांना न्यायालयाने १ मार्च पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानुसार सर्व २४ जणांना शुक्रवारी खेड जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन मंजूर केला.