लग्न बीडमध्ये, बिंग फुटले रत्नागिरीत; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 12:31 PM2024-05-15T12:31:01+5:302024-05-15T12:35:19+5:30
दोघांमध्ये काही कारणातून वाद झाल्याने त्या तरुणीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
रत्नागिरी : बीड येथे अल्पवयीन मुलीशी लग्न करुन रत्नागिरीत आलेल्या जोडप्याचे बिंग अखेरीस फुटले. तरुणीने घरगुती वादातून झाेपेच्या गाेळ्या घेतल्या आणि तिला जिल्हा शासकीय रुणालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तपास केला असता सारा प्रकार समाेर आला. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकातून झिरो नंबरने बीड येथील पोलिस स्थानकात जोडप्याच्या पालकांविरोधात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी १८ वर्षे पूर्ण होऊन ५ दिवस झालेल्या विवाहित तरुणीने झोपेच्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने त्या मुलीची आणि तिच्या पतीची चौकशी केली. त्यावेळी तो तरुण २७ वर्षांचा आणि ती तरुणी ५ दिवसांपूर्वीच १८ वर्षे पूर्ण झालेली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
तसेच ही तरुणी त्या तरुणाच्या नात्यातीलच असून, त्यांच्यातील प्रेमसंबंधामुळे त्यांच्या नातेवाइकांनी या दाेघांचे काही महिन्यांपूर्वी बीड येथे लग्न लावून दिले होते. त्यानंतर नोकरीनिमित्त हे विवाहित जोडपे रत्नागिरीत आले होते. या दोघांमध्ये काही कारणातून वाद झाल्याने त्या तरुणीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, बीड येथे अल्पवयीन मुलीशी लग्न करून लपविलेला गुन्हा अखेर या आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेमुळे पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पाेलिसांनी जाेडप्याच्या विराेधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.