Ratnagiri: अर्जुना धरणावर अपघात; दोघांना गमवावा लागला जीव, चालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:05 PM2023-06-16T12:05:40+5:302023-06-16T12:24:37+5:30
वाहन धरणात कोसळले, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
राजापूर : अर्जुना धरणातील कमी झालेली पाण्याची पातळी आणि धरणाच्या पहिल्या टप्प्यावर अपघातग्रस्त गाडी अडकून पडल्याने बुधवारी मोठी जीवितहानी टळली. या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला असून, आठजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनाचा चालक राहुल गणेशवाडे (मिरज) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तोही या अपघातात जखमी झाला आहे.
अर्जुना प्रकल्प क्षेत्रात बुधवारी झालेल्या अपघातानंतर जोरदार टीकेची झोड उठली आहे. यापूर्वी काहीजण त्या धरणात बुडून मृत्युमुखी पडले आहेत. धरण क्षेत्रात वाहने जातातच कशी, असा प्रश्नही केला जात आहे.
अर्जुना धरण प्रकल्पाअंतर्गत लांजा तालुक्यातील आरगाव येथे सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामावरील दहा कामगार बुधवारी सायंकाळी उशिरा अर्जुना धरणावर फिरण्यासाठी गेले होते. अर्जुना धरणाकडे जाणारा मार्ग यापूर्वीच वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलेला असल्याने धरण पाहण्यासाठी येणारे लोक तेथे आपली वाहने घेऊन जाऊ शकत नाहीत; मात्र तेथे जाणारा वेगळा मार्ग माहीत असल्याने ते दहा कामगार वाहन घेऊन धरण क्षेत्रावर गेले.
सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांचे वाहन धरणात कोसळले. वाहनात बसलेले कामगार बाहेर फेकले गेले. धरणाची भिंत दगडाची असल्याने गंभीर मार बसून, दोघांचा मृत्यू, तर उर्वरित जखमी झाले असावेत, असे बोलले जात आहे.
अपघातग्रस्त वाहन हे धरणाच्या पहिल्या टप्प्यावरच अडकून थांबल्याने व आतील कामगार बाहेर फेकले गेल्याने वाहनासह सर्व कामगार खाली पाण्यात पडले नाहीत अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.
ग्रामस्थ धावले
अपघातानंतर झालेला मोठा आवाज ऐकून आजूबाजूची मंडळी धरणाच्या दिशेने धावून गेली. त्यावेळी हा प्रकार समजला. सर्व जखमींसह दोन मृत कामगारांना रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही कामगारांचे विच्छेदन झाल्यानंतर त्यांचे मृतदेह बिहारला रवाना झाले.
चौघे कोल्हापूरला
जखमींपैकी चार कामगारांची प्रकृती गंभीर असल्याने बुधवारी रात्रीच त्यांना कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य चौघांची स्थिती धोक्याबाहेर असल्याने रायपाटण ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार आता आठही कामगारांची प्रकृती स्थिर आहे. दहापैकी आठ कामगार हे यूपी, बिहारमधील असून ते एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते.