Ratnagiri: तिवरे धरणातील डोहात बुडून बालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 04:16 PM2024-05-09T16:16:56+5:302024-05-09T16:19:38+5:30
पाय घसरून पाण्यात पडला आणि गायब झाला
चिपळूण : फुटलेल्या तिवरे धरण विमोचकाजवळील डोहात कपडे धुण्यासाठी बहिणीबरोबर गेलेला अकरा वर्षीय बालक पाय घसरून बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली. रात्री उशिरापर्यंत स्थानिकांच्या मदतीने पोलिसांकडून शोधकार्य सुरू होते. अखेर बुधवारी सकाळी १० वाजता त्याचा मृतदेह डोहात सापडला. वंश संतोष खरात (१०, तिवरे धनगरवाडी) असे बुडालेल्या बालकाचे नाव आहे.
२ जुलै २०१९ रोजी तिवरे धरण फुटले. त्यानंतर या धरणाच्या विमोचकाजवळ डोह निर्माण झाला आहे. साधारण वीस ते पंचवीस फूट तो खोल असून सध्या त्यामध्ये गाळही साठला आहे. त्याठिकाणी जनावरांना पाण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी ये-जा सुरू असते. मंगळवारी वंशची बहीण कपडे धुण्यासाठी या डोहाजवळ गेली होती. वंशही तिच्यासोबत गेला. या डोहापासून काही अंतरावर वंशचे वडीलही काम करत होते. यावेळी वंश पाय घसरून पाण्यात पडला आणि गायब झाला.
याबाबतची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर शोध घेण्यात आला. अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकातही माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र त्यामध्ये यश येत नव्हते. अखेर रात्री पंप लावून डोहातील पाणी काढणे सुरू करण्यात आले होते. मात्र यश आले नाही. बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु झाली. त्यावेळी वंशचा मृतदेह सापडला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा फणसवाडी येथे शिकणारा वंश पाचवी पास होऊन सहावीत गेला होता. त्याच्या पश्चात आईवडील, दोन बहिणी असा परिवार आहे.